Breaking : bolt
गोळीच्या नावाखाली विषाचा व्यापार, रुग्णांच्या जिवाशी कोणाचा व्यवहार ? सत्तेचा वरदहस्त की भ्रष्टाचाराचे जाळे, CBI चौकशीतच उघडतील गैरव्यवहाराचे ताळे...बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा पर्दाफाश, नियुक्ती देणारे अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात..?लेखणीला दाबण्याचे षड्यंत्र, अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमतेची परीक्षा आणि औषध खरेदीतील अनुत्तरित प्रश्न...कोल्हापूरच्या औषध खरेदीसाठी ₹४.५० कोटींच्या निविदा प्रक्रियेत सर्व पात्र कंपन्यांना समान संधी मिळणार का..?प्रसूतीचा नैसर्गिक मार्ग की शस्त्रक्रियेचा वाढता बाजार ? खासगी रुग्णालयांतील ५९ टक्के सिझेरियनने आरोग्य व्यवस्थेसमोर उभे केले गंभीर प्रश्नमहानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरतीत ‘पिक अँड चूज’चा आरोप, पात्र अधिकाऱ्यांवर अन्याय ?२५५ कंपन्यांच्या निविदेत केवळ दोनच पात्र, आरोग्य विभागाच्या ४,५०० कर्मचाऱ्यांच्या भरतीला हायकोर्टाची स्थगिती, १४.८५ टक्के सेवा शुल्काचा संशयास्पद पेचआरोग्य विभागाचा कारभार रुग्णांच्या जिवावर बेतणारा ठरत आहे...?कुंभमेळ्यासाठी कोट्यवधींचा निधी, पण आदिवासींच्या डायलिसिसला टाळेआरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आठ दिवसांतच सोलापूर जिल्हा रुग्णालयाचे पितळ उघडे !

जाहिरात

 

गोळीच्या नावाखाली विषाचा व्यापार, रुग्णांच्या जिवाशी कोणाचा व्यवहार ? सत्तेचा वरदहस्त की भ्रष्टाचाराचे जाळे, CBI चौकशीतच उघडतील गैरव्यवहाराचे ताळे...

schedule27 Nov 26 person by visibility 27 categoryमहाराष्ट्रराजकीय घडामोडीक्राइम न्यूजकोल्हापूरसंपादकीय

सुशांत पोवार (विशेष वृत्त) - औषध म्हणजे केवळ रासायनिक घटकांचे मिश्रण नव्हे तर ते आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णाच्या जगण्याचे आश्वासन असते. डॉक्टरांनी लिहून दिलेली गोळी हातात घेताना रुग्णाला तिच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करावा लागत नाही, कारण ती औषधनिर्मितीच्या वैधानिक प्रक्रियेतून तपासली गेली आहे, शासकीय यंत्रणेच्या देखरेखीखाली बाजारात आली आहे आणि सरकारी रुग्णालयाच्या औषध भांडारातून त्याच्या हातात पोहोचली आहे, असा त्याचा रास्त विश्वास असतो. मात्र याच विश्वासाच्या पायावर जर निकृष्ट, अप्रमाणित अथवा औषधी घटकच नसलेल्या गोळ्यांची विक्री उभी राहत असेल, तर हा केवळ औषधनिर्मितीतील गैरप्रकार राहत नाही तर तो सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षिततेवर झालेला गंभीर आघात ठरतो. पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या कंपनीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने केलेली दुसऱ्यांदा परवाना रद्द करण्याची कारवाई याच वास्तवाचे भयावह दर्शन घडवते. या प्रकरणाने केवळ एका कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही, तर शासकीय रुग्णालयांच्या औषध खरेदीपासून ते रुग्णांच्या हातात औषध पोहोचेपर्यंतच्या संपूर्ण साखळीची विश्वासार्हता तपासण्याची वेळ आणली आहे.
            २३ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या सुनावणीनंतर FDA च्या परवाना प्राधिकरणाने कंपनीचे Form 25 आणि Form 28 उत्पादन परवाने रद्द केले. उत्पादन, पॅकिंग, चाचणी आणि वितरण तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले. त्यामागील कारणे केवळ तांत्रिक त्रुटींच्या चौकटीत बसणारी नाहीत. आवश्यक उत्पादन परवानग्या न घेता नऊ औषधांचे उत्पादन व विक्री केल्याचे निष्पन्न झाले आणि सरकारी विश्लेषकांच्या प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये ही औषधे निकृष्ट दर्जाची (Not of Standard Quality), चुकीचे लेबल असलेली (Misbranded) अथवा बनावट (Spurious) असल्याचे आढळले. यातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे 'Ibucare Plus' या वेदनाशामक गोळीत लेबलवर नमूद असलेला आयबुप्रोफेन हा सक्रिय औषधी घटकच आढळला नाही. 'Carevita-M' या मल्टिव्हिटॅमिन गोळीत तर लेबलवर नमूद केलेले नऊ जीवनसत्त्वे व घटकही आढळले नाहीत. म्हणजे रुग्णाने औषध समजून गोळी गिळायची, पाकिटावर लिहिलेल्या घटकांवर विश्वास ठेवायचा परंतु त्या गोळीत उपचारासाठी आवश्यक असलेला घटकच नसेल, तर औषधनिर्मितीच्या नावाखाली नेमके काय विकले जात होते, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
           या प्रकरणाची व्याप्ती आणखी गंभीर आहे. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आणि पचनसंस्थेच्या विकारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचाही या नऊ औषधांमध्ये समावेश असल्याचे FDA च्या कारवाईविषयक माहितीतून समोर आले आहे. काही औषधांमध्ये घोषित प्रमाणापेक्षा सक्रिय घटक अत्यल्प आढळले, तर काही औषधे विरघळण्याच्या चाचणीत अपयशी ठरली. 'Carepanta D2' मधील Pantoprazole चे प्रमाण घोषित मात्रेच्या तुलनेत ४०.९० टक्के, तर Domperidone चे प्रमाण ७५.३५ टक्के असल्याचे प्रयोगशाळा निष्कर्षांत नमूद झाले. 'Carezinc' मध्ये Vitamin C चे प्रमाणही घोषित मात्रेपेक्षा कमी आढळले. औषधाच्या गुणवत्तेचा प्रश्न हा केवळ प्रयोगशाळेतील आकड्यांचा विषय नाही. मधुमेहाच्या रुग्णाला औषध घेतल्यानंतरही रक्तातील साखर नियंत्रणात येत नसेल, हृदयविकाराच्या रुग्णाला अपेक्षित उपचारपरिणाम मिळत नसेल किंवा पोटाच्या विकाराने त्रस्त रुग्णाला आराम मिळत नसेल, तर त्यामागे औषधाची परिणामकारकता हा तपासाचा विषय ठरू शकतो. अर्थात प्रत्येक उपचार अपयशाचे कारण निकृष्ट औषधच असते, असे म्हणता येणार नाही परंतु औषधातील सक्रिय घटकच अनुपस्थित असल्याचा प्रयोगशाळा अहवाल समोर आल्यानंतर त्या शक्यतेकडे दुर्लक्ष करणे हा रुग्णांच्या सुरक्षिततेशी केलेला अक्षम्य निष्काळजीपणा ठरेल.
             यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही कारवाई पहिल्यांदाच झालेली नाही. जुलै २०२६ मध्ये करण्यात आलेल्या संयुक्त तपासणीत कंपनीच्या उत्पादन केंद्रात गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस अर्थात GMP संदर्भातील २५ गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. उत्पादनाच्या बॅच नोंदींशिवाय लाखो गोळ्यांची निर्मिती, कच्च्या मालाच्या वापराच्या नोंदींचा अभाव, गुणवत्ता तपासणीतील अनियमितता आणि साठवणुकीच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष अशा बाबी निदर्शनास आल्या. सुमारे १३.८६ लाख CAREGYL-400 गोळ्यांचे उत्पादन आवश्यक बॅच नोंदी व चाचणी अहवालांशिवाय करण्यात आले होते. त्यापैकी ५.२ लाख गोळ्यांचे वितरणही झाले होते. सरकारी प्रयोगशाळेच्या विश्लेषणात या औषधात अपेक्षित Metronidazole चे प्रमाण केवळ ३२.४४ टक्के आढळले. ७ सप्टेंबर रोजी परवाना रद्द करण्याची कारवाई झाल्यानंतरही पुढील तपासणीत नऊ औषधांच्या अनधिकृत उत्पादनाचा गंभीर प्रकार समोर येणे, हे औषध नियमनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कंपनीने रुग्णांच्या तक्रारी नसल्याचा युक्तिवाद केला असला, तरी तक्रार नोंदली गेली नाही म्हणजे औषध सुरक्षित होते, असा निष्कर्ष काढता येत नाही. रुग्णाला औषधातील घटकांचे प्रमाण तपासता येत नाही तर त्याच्याकडे प्रयोगशाळा नसते. तो उपचारासाठी डॉक्टरांवर आणि औषधाच्या गुणवत्तेसाठी नियामक यंत्रणेवर विश्वास ठेवतो. त्या विश्वासाला तडा गेल्यानंतर तक्रारींची संख्या मोजण्यापेक्षा औषधातील दोष शोधणे हीच प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे.
             याच प्रकरणात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (YCM) मध्यवर्ती औषध भांडारातून सुमारे १.७२ कोटी रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. म्हणजे निकृष्ट औषधांचा प्रश्न कारखान्याच्या चार भिंतींमध्ये अडकून राहिलेला नव्हता तर तो सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या पुरवठा साखळीपर्यंत पोहोचला होता. औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीकडे परवाना आहे की नाही, संबंधित उत्पादनाला स्वतंत्र मान्यता आहे की नाही, बॅचची गुणवत्ता तपासली आहे की नाही, पुरवठादाराने आवश्यक प्रमाणपत्रे दिली आहेत की नाही आणि रुग्णालयाने औषध स्वीकारताना कोणती तपासणी केली, या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कागदपत्रांतून मिळाले पाहिजे. सरकारी रुग्णालयातील औषध भांडार म्हणजे केवळ साठवणुकीची खोली नाही तर ती रुग्णांच्या उपचारसुरक्षेची पहिली संरक्षणरेषा आहे. त्या संरक्षणरेषेतूनच संशयास्पद औषधांचा प्रवेश झाला असेल, तर केवळ उत्पादकावर कारवाई करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. खरेदी प्रक्रिया, तांत्रिक मान्यता, पुरवठा आदेश, प्राप्ती तपासणी, बॅच प्रमाणपत्रे आणि प्रत्यक्ष वितरण यांचीही साखळीवार चौकशी झाली पाहिजे.
             आता या प्रकरणाचे धागेदोरे कोल्हापूरपर्यंत पोहोचत असल्याची माहिती समोर येत आहे. उपलब्ध औषध पुरवठा कागदपत्रांनुसार कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय आस्थापनांमध्ये या कंपनीची Piride-2 (Glimepiride) ही मधुमेहावरील गोळी आणि CareSpas (Dicyclomine) हे पोटाच्या विकारांवरील औषध पुरवठा झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. ही बाब केवळ पुरवठ्याच्या नोंदी तपासून संपणारी नाही. संबंधित औषधांचे नेमके बॅच क्रमांक कोणते ? किती गोळ्यांचा पुरवठा झाला ? कोणत्या रुग्णालयांनी त्या स्वीकारल्या ? किती साठा वितरित झाला ? किती रुग्णांना तो देण्यात आला ? संबंधित बॅचचे अधिकृत गुणवत्ता प्रमाणपत्र काय सांगते ? त्या बॅचचे नमुने सरकारी प्रयोगशाळेत तपासले आहेत का ? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय कोल्हापुरातील रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारासाठी नियमित औषध घेणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत संशयाची एकही बाब दुर्लक्षित करण्याचे कारण नाही. विशेषतः शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना औषधाची निवड करण्याचे स्वातंत्र्य नसते. उपलब्ध करून दिलेले औषधच त्यांच्यासाठी उपचाराचा आधार असतो. त्या आधारातच त्रुटी असल्याची शक्यता निर्माण झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार ?
              या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बनावट अथवा निकृष्ट औषधांच्या पुरवठ्याबाबत यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा विषय अधिकच गंभीर बनतो. संबंधित तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यालयाने जाहीर केलेल्या अधिकृत ईमेल माध्यमातून कोल्हापुरातील औषध पुरवठ्याबाबत लेखी तक्रार सादर करण्यात आली होती. मात्र चार महिने उलटूनही तक्रारीची चौकशी कुठपर्यंत पोहोचली, कोणत्या अधिकाऱ्याला जबाबदारी देण्यात आली, नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले का, चौकशी अहवाल तयार झाला का आणि तक्रारदाराला त्याबाबत काय कळविण्यात आले, याची माहिती मिळाली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्याची सत्यता प्रशासनाने नोंदींसह स्पष्ट केली पाहिजे. तक्रार दाखल झाल्यानंतर तिचा क्रमांक, प्राथमिक छाननी, तपास अधिकाऱ्याची नियुक्ती, नमुना संकलन, प्रयोगशाळा परीक्षण आणि अंतिम निर्णय या प्रत्येक टप्प्याची नोंद असणे अपेक्षित आहे. तक्रारदाराला उत्तर न देणे ही केवळ संवादातील त्रुटी नाही तर ती सार्वजनिक तक्रार निवारण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे. तक्रारीत तथ्य नसेल तर ती कारणांसह निकाली काढा, तथ्य असेल तर दोषींवर कारवाई करा. परंतु तक्रारदाराला अंधारात ठेवून प्रकरण फाइलमध्ये गाडण्याची पद्धत कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही.
            याच ठिकाणी राजकीय हस्तक्षेप, प्रशासकीय दबाव अथवा हितसंबंधांच्या प्रभावाचा संशय निर्माण होत असल्यास त्याचीही निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. संबंधित अधिकारी, पुरवठादार, खरेदी समित्या आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे संभाव्य हितसंबंध तपासण्याची जबाबदारी तपास यंत्रणेची आहे. औषध खरेदीत कोणाचा दबाव होता का ? गुणवत्ता निकषांमध्ये तडजोड झाली का ? विशिष्ट पुरवठादाराला लाभ मिळवून देण्यासाठी अटी बदलण्यात आल्या का ? निकृष्ट औषधांचा अहवाल उपलब्ध असूनही पुरवठा सुरू ठेवण्यात आला का ? तक्रारींच्या चौकशीत जाणीवपूर्वक विलंब करण्यात आला का ? या प्रश्नांची उत्तरे कागदपत्रे, फाइल नोटिंग, निविदा अभिलेख, ई-मेल व्यवहार आणि अधिकृत आदेश तपासल्याशिवाय मिळणार नाहीत. पण एक गोष्ट निर्विवाद आहे, औषधांच्या गुणवत्तेच्या प्रश्नात कोणताही राजकीय, प्रशासकीय किंवा आर्थिक वरदहस्त रुग्णांच्या सुरक्षिततेपेक्षा मोठा असू शकत नाही. सार्वजनिक पद हे संरक्षणाचे कवच नसून सार्वजनिक उत्तरदायित्वाची शपथ आहे, याची जाणीव संबंधित प्रत्येक घटकाला करून देण्याची वेळ आली आहे.
              याच अनुषंगाने सोमवारी, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन कोल्हापुरात वितरित झालेल्या औषधांचे नमुने, बॅच रिपोर्ट, ई-चलन आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे सादर करण्याचा मानस आहे. यापूर्वी दाखल केलेल्या तक्रारीवर नेमकी कोणती कार्यवाही झाली, चौकशी कोणत्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली, तपासणी झाली का, प्रयोगशाळा अहवाल मागविण्यात आले का आणि विलंब झाला असल्यास त्याची कारणे काय, याचा लेखी खुलासा मागितला जाणार आहे. चौकशीतील दिरंगाई, कर्तव्यात कसूर अथवा अभिलेखांमध्ये संशयास्पद विसंगती आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासून नियमानुसार विभागीय चौकशी आणि आवश्यकतेनुसार निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही केली जाणार आहे. मात्र कोणत्याही अधिकाऱ्यावरील कारवाई ही केवळ मागणीच्या आधारे नव्हे, तर निष्पक्ष चौकशी, उपलब्ध पुरावे आणि लागू सेवा नियमांच्या आधारेच झाली पाहिजे. 
           या चौकशीची व्याप्ती केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरती मर्यादित ठेवणेही पुरेसे ठरणार नाही. कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि अन्य शासकीय वैद्यकीय आस्थापनांमध्ये मागील दोन वर्षांत पुरवठा झालेल्या औषधांचा आणि वैद्यकीय साहित्याचा सखोल लेखापरीक्षणात्मक तपास झाला पाहिजे. प्रत्येक खरेदीचा पुरवठा आदेश, उत्पादन परवाना, उत्पादननिहाय मान्यता, बॅच क्रमांक, विश्लेषण प्रमाणपत्र (Certificate of Analysis), पुरवठादाराचे दस्तऐवज, प्राप्ती नोंद, साठा नोंदवही आणि वितरण नोंदी ताब्यात घेण्यात याव्यात. ज्या औषधांच्या गुणवत्तेबाबत यापूर्वी तक्रारी आल्या आहेत, त्यांचे नमुने स्वतंत्र सरकारी प्रयोगशाळेत तपासावेत. यापूर्वी नेमण्यात आलेल्या चौकशी समित्यांचे अहवालही मागवून त्यातील शिफारशींची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली की नाही, याची पडताळणी करावी. कोल्हापुरातील आधीच्या चौकशी प्रक्रियेबाबतच प्रश्न उपस्थित झाले असतील, तर त्याच स्थानिक प्रशासकीय साखळीच्या अधीन राहून पुन्हा चौकशी करण्याऐवजी राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र उच्चस्तरीय समिती नेमणे अधिक उचित ठरेल. संबंधित कोल्हापुरातील ड्रग्सचे उपआयुक्तांना प्राथमिक चौकशीच्या नियंत्रणातून बाहेर ठेवून स्वतंत्र पथकाकडून तपास केला, तर हितसंबंधांचा संभाव्य संघर्ष टाळता येईल आणि निष्कर्षांची विश्वासार्हता वाढेल. दोष सिद्ध झाल्यास उत्पादक, वितरक, पुरवठा प्रक्रियेत सहभागी अधिकारी आणि नियमभंग करणाऱ्या संबंधित घटकांवर त्यांच्या भूमिकेनुसार कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
            औषध व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० हा केवळ परवाने देण्याचा किंवा कागदपत्रांची पूर्तता तपासण्याचा कायदा नाही. औषधांची सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारकता यांचे संरक्षण करण्याची त्यामागे स्पष्ट भूमिका आहे. कायद्यातील कलम १८ अंतर्गत प्रतिबंधित औषधांचे उत्पादन आणि विक्रीविषयक तरतुदी आहेत; कलम २२ अंतर्गत अधिकृत निरीक्षकांना तपासणी, नमुने घेणे आणि आवश्यक कारवाईचे अधिकार आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या कंपनीचा परवाना रद्द करणे ही महत्त्वाची नियामक कारवाई असली, तरी त्यानंतर पुरवठा झालेल्या प्रत्येक संशयित बॅचचा मागोवा घेणे, औषधांचा साठा रोखणे, रुग्णालयांना तातडीने सूचना देणे, वितरित साठ्याची परत मागणी करणे आणि आवश्यकतेनुसार बाधित रुग्णांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचविणेही तितकेच आवश्यक आहे. परवाना रद्द झाला म्हणजे रुग्णांच्या हातात आधीच गेलेल्या गोळ्यांचा प्रश्न आपोआप संपत नाही. कारवाईचा खरा अर्थ तेव्हाच सिद्ध होईल, जेव्हा दोषपूर्ण औषधांचा उर्वरित साठा सुरक्षितपणे रोखला जाईल, पुरवठा साखळीतील जबाबदार व्यक्ती निश्चित होतील आणि भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक व्यवस्था उभी राहील. सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभाग आणि कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभाग यांनी Not For Standard Quality Medicine पुरवठादाराला परत केल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे त्यामुळे अशी अजुन किती औषधे परत केलीत त्याचीही उच्चस्तरीय चौकशी FDA कडून झाली पाहिजे तरच ह्यामध्ये सत्य बाहेर येऊ शकेल.
          FDA प्रशासनाने नागरिकांसाठी अधिकृत तक्रार निवारण पोर्टल आणि टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. औषधांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी नागरिकांनी अधिकृत पोर्टलचा वापर करावा, तसेच तक्रारीचा संदर्भ क्रमांक, नमुन्यांची माहिती आणि उपलब्ध कागदपत्रे जतन करावीत. मात्र नागरिकांनी तक्रार दाखल करावी, पुरावे द्यावेत आणि त्यानंतर महिनोनमहिने उत्तराची वाट पाहावी, अशी व्यवस्था असू नये. तक्रारीच्या प्रत्येक टप्प्यावर तिची सद्यस्थिती उपलब्ध करून देणे, तपासाची कालमर्यादा निश्चित करणे आणि अंतिम निर्णयाचे कारण स्पष्ट करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. तक्रारदार हा प्रशासनाचा विरोधक नसतो तर तो व्यवस्थेतील संभाव्य त्रुटी दाखविणारा नागरिक असतो. त्याच्या माहितीची दखल घेणे म्हणजे प्रशासनाची प्रतिष्ठा कमी करणे नव्हे, तर प्रशासन अधिक सक्षम करण्याची संधी स्वीकारणे होय. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने अनेक संकटांचा सामना केला आहे. दुर्गम भागातील रुग्णालये, अपुरी मनुष्यबळ व्यवस्था, औषधसाठ्याचे नियोजन, वैद्यकीय साहित्याची उपलब्धता आणि उपचारांचा वाढता खर्च अशा असंख्य आव्हानांमध्ये डॉक्टर, परिचारिका, औषधनिर्माता आणि आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष सेवेत झटत आहेत. त्यांच्या प्रामाणिक सेवेवर नागरिकांचा विश्वास टिकून राहावा, यासाठी औषधपुरवठ्याची साखळी निर्दोष असणे अपरिहार्य आहे. काही उत्पादकांच्या अनियमिततेमुळे संपूर्ण औषधनिर्मिती उद्योगावर संशयाची सावली पडू नये. त्याचप्रमाणे उद्योगातील प्रामाणिक घटकांच्या अस्तित्वाचा आधार घेऊन नियमभंग करणाऱ्यांना संरक्षणही मिळू नये. गुणवत्ता ही औषधनिर्मिती उद्योगाची प्रतिष्ठा आहे आणि नियमन ही रुग्णांच्या सुरक्षिततेची हमी. या दोन्हींची सांगड घालण्याची जबाबदारी FDA वर आहे.
                 आज प्रश्न एका कंपनीचा, एका जिल्ह्याचा अथवा एका अधिकाऱ्याचा नाही. प्रश्न आहे तो सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या त्या सामान्य माणसाचा, जो औषध विकत घेण्याची ऐपत नसल्यामुळे सरकारी औषधावर अवलंबून आहे. त्या मधुमेही रुग्णाचा, जो रोजची गोळी घेऊन आपले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करतो. त्या वृद्धाचा, जो हृदयविकाराच्या औषधावर विश्वास ठेवून जगतो आणि त्या आईचा, जिला आपल्या मुलाला रुग्णालयातून मिळालेली प्रत्येक गोळी सुरक्षित आहे, असे वाटते. या माणसांच्या हातात औषधाऐवजी केवळ नावाचे पाकीट दिले गेले असेल, तर ती केवळ आर्थिक फसवणूक नाही तर तो त्यांच्या विश्वासाचा, आरोग्याच्या हक्काचा आणि सार्वजनिक व्यवस्थेच्या नैतिक अधिष्ठानाचा प्रश्न आहे.
            FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणात केलेली कारवाई निश्चितच नियामक यंत्रणेच्या अधिकारांचा वापर करून निकृष्ट औषधांविरोधात कठोर भूमिका घेता येते, हे दाखवून देते. परंतु आता खरी कसोटी कोल्हापूरच्या तक्रारींच्या चौकशीची, पुरवठा साखळीतील जबाबदारी निश्चित करण्याची आणि चार जिल्ह्यांतील मागील दोन वर्षांच्या औषधपुरवठ्याचे स्वतंत्र परीक्षण करण्याची आहे. जेजुरीतील कंपनीवर कारवाई झाली, एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही तर तिच्या औषधांनी कोणकोणत्या शासकीय आस्थापनांपर्यंत प्रवास केला, त्या प्रवासात कोणत्या स्तरावर तपासणी झाली आणि कुठे नियमांची पायमल्ली झाली, याचा संपूर्ण हिशेब जनतेसमोर आला पाहिजे. दोषी उत्पादकाला शिक्षा झाली पाहिजे, दोषी पुरवठादाराला जबाबदार धरले पाहिजे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यालाही त्याच्या पदाचा मुलाहिजा न ठेवता कायद्याप्रमाणे उत्तरदायी केले पाहिजे. निष्पाप अधिकारी किंवा प्रामाणिक उत्पादक यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी चौकशी तितकीच पारदर्शक आणि पुराव्याधिष्ठित असली पाहिजे. कारण शेवटी औषधाच्या गोळीवर छापलेली किंमत ही पैशांत मोजता येते पण त्या गोळीवर ठेवलेला रुग्णाचा विश्वास अमूल्य असतो. त्या विश्वासाशी प्रतारणा करणाऱ्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजे आणि तो धाक केवळ परवाना रद्द करण्यापुरता मर्यादित न राहता दोषसिद्धीपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रशासनाने हे लक्षात ठेवावे की फाइलवरील लाल शेरा एखाद्या प्रकरणाचा निकाल असू शकतो पण रुग्णाच्या आयुष्यातील अनिश्चितता त्याने संपत नाही. ज्या दिवशी सरकारी रुग्णालयातून मिळणाऱ्या प्रत्येक गोळीच्या गुणवत्तेची खात्री रुग्णाला निर्भयपणे देता येईल, त्या दिवशीच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने विश्वासाची खरी परीक्षा उत्तीर्ण केली असे म्हणता येईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes