Breaking : bolt
आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आठ दिवसांतच सोलापूर जिल्हा रुग्णालयाचे पितळ उघडे !आरोग्य संवाद यात्रेपूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट 'अ' (MAGMO) संघटनेचा सावधगिरीचा इशारा !गोकुळमध्ये मतदारांचा कौल की सत्तेचा खेळ ? १३ चा जनादेश १६ च्या गणितापुढे झुकला!यंदा दिव्यांच्या प्रकाशात डॉक्टरांच्या सन्मानाचा दीप उजळला...नांदेडच्या आरोग्य विभागातील कथित भ्रष्टाचाराची तक्रार आरोग्यमंत्र्यांपर्यंतभुदरगडमध्ये क्रशर चालकांचे उत्खनन संशयाच्या भोवऱ्यातजागेवर उभ्या रुग्णवाहिकांनी प्यायले ५० लाखांचे डिझेल, कागदोपत्री धावल्या रुग्णवाहिका..!आरोग्य संवाद की समस्यांचा उद्रेक ? पहिल्याच दोन दिवसांत आव्हानांचा डोंगर, शिल्लक ३३ दिवसांच्या यात्रेपुढे आरोग्य व्यवस्थेची अग्निपरीक्षाराष्ट्रीय नेत्यांची टिंगल करणाऱ्यांना राजाश्रय कुणाचा ? थट्टा मस्करी झालेले नेत्यांचे समर्थक आणि संबंधित समाजघटक रस्त्यावर उतरले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार ?अखेर वादग्रस्त पदस्थापनेचा तिढा सुटला, सेवानिवृत्तीनंतर मुदतवाढ घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आता वैद्यकीय सेवाच द्यावी लागणार

जाहिरात

 

आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आठ दिवसांतच सोलापूर जिल्हा रुग्णालयाचे पितळ उघडे !

schedule14 Nov 26 person by visibility 42 categoryमहाराष्ट्रराजकीय घडामोडीआरोग्य विभाग

सुशांत पोवार (विशेष वृत्त) - राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आरोग्य संवाद यात्रेच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा रुग्णालयात प्रशासकीय यंत्रणेने जय्यत तयारी केली. नव्याने उभारण्यात आलेली कॅथलॅब, आयसीयू आणि अद्ययावत सुविधांचे दर्शन घडवण्यात आले. मात्र, या झगमगाटाच्या पडद्यामागे सुरू असलेले रुग्णांचे हाल आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत का ? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. कारण मंत्र्यांच्या दौऱ्याला अवघे आठ दिवसही पूर्ण होत नाहीत तोच जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
         राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडी नेत्या विद्या लोलगे यांनी बुधवारी जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर या प्रकाराचा पर्दाफाश केला. २ नोव्हेंबरपासून डायलिसिस सेंटर बंद असल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे, डायलिसिससाठी आलेल्या जवळपास ५० ते ६० रुग्णांना उपचार न मिळाल्याने माघारी फिरावे लागल्याचा गंभीर प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
          आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे, महिला ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुख डॉ.जयश्री ढवळे तसेच संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांकडून पाहणीची तयारी करण्यात आली होती. नव्याने उभारलेल्या कॅथलॅब आणि आयसीयूची पाहणी मंत्र्यांना घडवण्यात आली. मात्र, रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले डायलिसिस सेंटर त्यांच्या पाहणीच्या कक्षेत आले नाही, ही बाब आता संशय निर्माण करणारी ठरत आहे. याच दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील जिल्हा रुग्णालयातील विविध वॉर्डना भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला होता. मात्र, दोन मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही डायलिसिस सेंटर बंद असल्याची वस्तुस्थिती समोर आली नसेल, तर प्रशासकीय यंत्रणेच्या पाहणीचा नेमका उपयोग काय ? मंत्र्यांसमोर दाखवण्यासाठी एक चित्र आणि प्रत्यक्ष रुग्णांसाठी दुसरेच वास्तव, असा कारभार सुरू आहे का ?
           डायलिसिस ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी जीवनावश्यक उपचारप्रक्रिया आहे. अशा रुग्णांना ठरावीक वेळापत्रकानुसार उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असते. उपचार खंडित झाल्यास त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत शासकीय जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा बंद राहणे ही केवळ प्रशासकीय त्रुटी नसून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या जबाबदारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. विशेष म्हणजे, जिल्हा रुग्णालयातील मोफत डायलिसिस सेवा अनिश्चित काळासाठी बंद असल्याचा फलक लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शासन मोफत उपचारांसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते परंतु प्रत्यक्षात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना परत जावे लागत असेल, तर या मोफत आरोग्यसेवेचा लाभ नेमका कोणाला मिळतोय ? रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी यांनी रुग्णांचा वाढता रोष लक्षात घेऊन लवकरच डायलिसिस सेंटर सुरू होईल, अशी माहिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, 'लवकरच सुरू होईल' या आश्वासनाने आजच्या तारखेला उपचारांची गरज असलेल्या रुग्णांचे काय होणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या वेळी बिराजदार शिवसेना महिला आघाडी नेत्या अरुणा बेंजरपे उपस्थित होत्या.
          तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटन करण्यात आले. अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभारल्याचा गाजावाजा झाला. मात्र, उद्घाटनाच्या वेळी झालेला थाट आणि आजच्या घडीला त्या सुविधांच्या प्रत्यक्ष संचालनाची स्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयातील विविध विशेष वॉर्डना आवश्यक अनुदान आणि संचालनासाठी निधी उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याची माहिती समोर येत आहे. इमारती उभारणे, उद्घाटने करणे आणि फलक लावणे एवढ्याने आरोग्यसेवा सक्षम होत नाही. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, आवश्यक यंत्रसामग्री, औषधे, तांत्रिक देखभाल आणि नियमित निधीची उपलब्धता असणे गरजेचे आहे.
          सोलापूर दौऱ्यावेळी आरोग्यमंत्र्यांना डायलिसिस सेंटर बंद असल्याची माहिती देण्यात आली होती का ? जिल्हा शल्यचिकित्सकांनी या महत्त्वाच्या सुविधेची वस्तुस्थिती मंत्र्यांसमोर मांडली होती का ? २ नोव्हेंबरपासून सेवा बंद असताना पाहणीच्या वेळी ही बाब निदर्शनास का आणून देण्यात आली नाही ? संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती लपवली असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित होणार का ? हे प्रश्न केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे नाहीत तर हे प्रश्न त्या रुग्णांच्या आयुष्याशी संबंधित आहेत, ज्यांना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो.
          आरोग्यमंत्र्यांचे दौरे हे केवळ स्वागत, सत्कार, छायाचित्रे आणि नव्या इमारतींच्या पाहणीपुरते मर्यादित राहता कामा नयेत. मंत्र्यांनी रुग्णांच्या नोंदी तपासाव्यात, बंद असलेल्या सेवांची माहिती घ्यावी आणि प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधावा. सोलापूर जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा बंद राहण्यामागचे नेमके कारण, जबाबदार अधिकारी, निधीची उपलब्धता आणि सेवा पूर्ववत सुरू करण्याची निश्चित तारीख याबाबत आरोग्य विभागाने तातडीने खुलासा करावा. कारण, रुग्णालयाच्या भिंतींवर अत्याधुनिक सुविधांचे फलक झळकणे म्हणजे आरोग्यसेवा सुरू असणे नव्हे तर रुग्णाला वेळेवर उपचार मिळणे म्हणजेच खऱ्या अर्थाने आरोग्यसेवा, आता आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची केवळ चौकशी करण्याचे आश्वासन न देता प्रत्यक्ष डायलिसिस सेवा सुरू करून दाखवावी. अन्यथा, आरोग्य संवाद यात्रेतील संवाद आणि रुग्णालयातील वास्तव यातील दरी आणखी मोठी होत असल्याचेच स्पष्ट होईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes