आरोग्य संवाद यात्रेपूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट 'अ' (MAGMO) संघटनेचा सावधगिरीचा इशारा !
schedule11 Nov 26
person by
visibility 19
categoryमहाराष्ट्रराजकीय घडामोडीकोल्हापूरआरोग्य विभाग
सुशांत पोवार (विशेष वृत्त) - महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी, जनतेच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी आणि आरोग्य सेवा लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट 'अ' संघटनेने (MAGMO) राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविलेले पत्र आरोग्य विभागातील अंतर्गत परिस्थितीवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण करणारे ठरत आहे.
संघटनेचे अध्यक्ष डॉ.राहुल कन्नमवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या पत्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णालयांची स्वच्छता, खाटांची उपलब्धता, रुग्णांशी आपुलकीचे वर्तन, गंभीर रुग्णांना वेळेत उपचार आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहिल्या नजरेत हे आवाहन रुग्णहिताचे वाटत असले, तरी पत्रातील पुढील मजकूर आरोग्य विभागातील प्रशासकीय आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यातील जबाबदारीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत आहे.
या पत्रातील सर्वाधिक महत्त्वाचा आणि लक्षवेधी मुद्दा म्हणजे, आरोग्य संस्थांमध्ये काम करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत संघटनेने यापूर्वीच आरोग्यमंत्र्यांना राज्य संघटनेच्या वतीने अवगत केल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर, आपल्या स्तरावर शक्य तेवढ्या चांगल्या सेवा रुग्णांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णालयातील स्वच्छता, आवश्यक खाटांची व्यवस्था, रुग्णांना आपुलकीची वागणूक, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, गंभीर रुग्णांना वेळेत उपचार आणि आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, अशा विविध बाबींचा उल्लेख पत्रात आहे. मात्र, प्रश्न असा आहे की, या सर्व गोष्टींची जबाबदारी केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची आहे का ? रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा, आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, निधी, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय मंजुरी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोणाची ? डॉक्टरांना सेवा देण्याची अपेक्षा करताना त्यांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही प्रशासनाने स्वीकारली आहे का ? डॉक्टरांकडून उत्तम सेवेची अपेक्षा असणे रास्त आहे पण आवश्यक सुविधा न देता केवळ डॉक्टरांना जबाबदार धरणे कितपत योग्य ? हा प्रश्न या पत्राच्या निमित्ताने उपस्थित होतो.
या पत्रातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे संघटनेने वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेली स्पष्ट ग्वाही. कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यानंतरही व्यवस्थेतील त्रुटींचे खापर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर फोडले गेले आणि त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई झाली, तर राज्य MAGMO संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. वास्तविक, एखाद्या संघटनेला आपल्या सदस्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ का यावी ? आरोग्य विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना व्यवस्थेतील त्रुटींच्या नावाखाली कारवाईची भीती वाटते आहे का ? आरोग्य संस्थांमधील अडचणींचे निराकरण करण्याऐवजी त्याची जबाबदारी खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांवर ढकलली जाण्याची शक्यता संघटनेला वाटते आहे का ? हे प्रश्न केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाहीत, तर सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित आहेत.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची आरोग्य संवाद यात्रा १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा उद्देश जिल्हानिहाय आरोग्यविषयक समस्या जाणून घेणे, त्यावर ठोस उपाययोजना करणे आणि आरोग्य सेवा लोकाभिमुख करणे हा आहे. परंतु या संवाद यात्रेचे खरे यश केवळ बैठका, भाषणे, छायाचित्रे आणि आश्वासनांवर मोजता येणार नाही तर प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांची वस्तुस्थिती तपासणे, औषधसाठ्याची उपलब्धता, रिक्त पदे, डॉक्टरांवरील कामाचा ताण, वैद्यकीय उपकरणांची अवस्था, निधीचा वापर आणि प्रशासकीय निर्णयांमधील अडथळे यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रुग्णालयातील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची निश्चिती करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल. विशेष लक्षवेधी बाब म्हणजे संघटनेचे हे पत्र १० नोव्हेंबर २०२६ रोजीचे आहे, तर पत्रात नमूद यात्रेचा प्रारंभ १ नोव्हेंबरपासून झालेला आहे. त्यामुळे यात्रेला सुरुवात झाल्यानंतर पूर्वतयारीविषयक पत्र का जारी करण्यात आले, याचेही स्पष्टीकरण अपेक्षित आहे.
आरोग्य विभाग हा केवळ सरकारी यंत्रणेचा एक विभाग नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक व्यवस्था आहे. येथे रुग्णाला वेळेत उपचार मिळणे महत्त्वाचे आहे, डॉक्टरांना काम करण्यासाठी आवश्यक सुविधा मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि प्रशासकीय यंत्रणेने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणेही आवश्यक आहे. MAGMO संघटनेच्या या पत्राने आरोग्य संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. डॉक्टरांनी आपली जबाबदारी टाळू नये, पण व्यवस्थेतील त्रुटींची जबाबदारीही केवळ डॉक्टरांच्या माथी मारली जाऊ नये. आरोग्यमंत्र्यांनी या पत्रातील प्रत्येक मुद्द्याची दखल घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घ्याव्यात. रुग्णालयांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींसाठी जबाबदारी निश्चित करावी. कारण अखेरीस प्रश्न एका संघटनेचा, एका मंत्र्याचा किंवा एका अधिकाऱ्याचा नाही. प्रश्न आहे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा. आरोग्य संवाद यात्रा ही केवळ व्यवस्थेचे दर्शन घडवणारी यात्रा न ठरता, व्यवस्थेतील आजारांचे निदान करून उपचार करणारी ठरली पाहिजे. अन्यथा संवादाचे व्यासपीठ उभे राहील पण रुग्णालयांतील वास्तव मात्र बदलणार नाही !