Breaking : bolt
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा पर्दाफाश, नियुक्ती देणारे अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात..?लेखणीला दाबण्याचे षड्यंत्र, अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमतेची परीक्षा आणि औषध खरेदीतील अनुत्तरित प्रश्न...कोल्हापूरच्या औषध खरेदीसाठी ₹४.५० कोटींच्या निविदा प्रक्रियेत सर्व पात्र कंपन्यांना समान संधी मिळणार का..?प्रसूतीचा नैसर्गिक मार्ग की शस्त्रक्रियेचा वाढता बाजार ? खासगी रुग्णालयांतील ५९ टक्के सिझेरियनने आरोग्य व्यवस्थेसमोर उभे केले गंभीर प्रश्नमहानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरतीत ‘पिक अँड चूज’चा आरोप, पात्र अधिकाऱ्यांवर अन्याय ?२५५ कंपन्यांच्या निविदेत केवळ दोनच पात्र, आरोग्य विभागाच्या ४,५०० कर्मचाऱ्यांच्या भरतीला हायकोर्टाची स्थगिती, १४.८५ टक्के सेवा शुल्काचा संशयास्पद पेचआरोग्य विभागाचा कारभार रुग्णांच्या जिवावर बेतणारा ठरत आहे...?कुंभमेळ्यासाठी कोट्यवधींचा निधी, पण आदिवासींच्या डायलिसिसला टाळेआरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आठ दिवसांतच सोलापूर जिल्हा रुग्णालयाचे पितळ उघडे !आरोग्य संवाद यात्रेपूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट 'अ' (MAGMO) संघटनेचा सावधगिरीचा इशारा !

जाहिरात

 

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा पर्दाफाश, नियुक्ती देणारे अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात..?

schedule24 Nov 26 person by visibility 55 categoryमहाराष्ट्रसंपादकीय

सुशांत पोवार (संपादकीय अग्रलेख) - एका बाजूला जन्मापासून किंवा अपघातामुळे गंभीर दिव्यांगत्व आलेल्या पात्र उमेदवाराला नोकरीसाठी संघर्ष करावा लागतो तर दुसऱ्या बाजूला दिव्यांगत्वाच्या टक्केवारीत कथित फेरफार करून शासकीय नोकरी मिळविण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मग हा आरक्षणाचा सामाजिक न्याय आहे की पात्र व्यक्तींच्या भविष्यावर घातलेला दरोडा ?
            दिव्यांग आरक्षण ही शासनाने दिलेली खैरात नाही तर समाजातील शारीरिक, मानसिक किंवा संवेदनात्मक अडचणींशी झुंज देणाऱ्या व्यक्तींना समान संधी मिळावी, त्यांना सन्मानाने जगता यावे आणि रोजगाराच्या क्षेत्रात त्यांच्यावर अन्याय होऊ नये, या उदात्त हेतूने भारतीय संविधानाच्या समानतेच्या तत्त्वावर उभारलेली ही व्यवस्था आहे. मात्र, याच व्यवस्थेचा गैरवापर करून काही व्यक्ती शासकीय नोकऱ्यांवर कब्जा करत असतील, तर त्यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती ? आज प्रश्न केवळ बनावट अपंगत्व प्रमाणपत्रांचा नाही तर प्रश्न आहे तो वैद्यकीय तपासणीतील पारदर्शकतेचा, दिव्यांगत्वाची टक्केवारी निश्चित करणाऱ्या वैद्यकीय मंडळांच्या विश्वासार्हतेचा, भरती प्रक्रिया राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जबाबदारीचा आणि शासनाच्या नियंत्रण यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा प्रश्न आहे.
          दृष्टीदोषाच्या बाबतीत वैद्यकीय मूल्यमापन करताना दोन्ही डोळ्यांची दृष्टी, योग्य चष्मा किंवा उपचारानंतरची दृष्टीक्षमता, दृश्य क्षेत्र (Visual Field) आणि संबंधित वैद्यकीय निकषांचा विचार केला जातो. एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गेलेली असली आणि दुसऱ्या डोळ्याची दृष्टी चांगली असली, तरी केवळ पहिल्या डोळ्याच्या स्थितीवरून संपूर्ण व्यक्तीला ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. त्यासाठी लागू असलेल्या अधिकृत निकषांनुसार मूल्यांकन आवश्यक असते. इथेच गंभीर प्रश्न निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीच्या एका डोळ्याला दृष्टीदोष असताना दुसरा डोळा व्यवस्थित कार्यरत आहे, तर त्याच्या प्रमाणपत्रावरील दिव्यांगत्वाची टक्केवारी कोणत्या वैद्यकीय चाचण्यांच्या आधारे निश्चित करण्यात आली ? त्या चाचण्यांचे मूळ अहवाल उपलब्ध आहेत का ? वैद्यकीय मंडळाने नेमके कोणते निकष वापरले ? या प्रश्नांची उत्तरे कागदपत्रांतून मिळाली पाहिजेत. कारण टक्केवारीतील काही गुणांचा फरक एखाद्या पात्र उमेदवाराच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो.
          श्रवणदोषाच्या बाबतीतही अनेक गैरसमज आहेत. एखादी व्यक्ती कानाचे अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र सादर करते, मात्र प्रत्यक्ष जीवनात श्रवणयंत्र वापरत नाही, म्हणून तिचे प्रमाणपत्र आपोआप बोगस ठरत नाही. काही व्यक्तींना विशिष्ट प्रकारचा श्रवणदोष असू शकतो आणि श्रवणयंत्राचा वापर न करण्यामागे वैद्यकीय कारणेही असू शकतात. मात्र, प्रमाणपत्र देताना श्रवणक्षमतेची वस्तुनिष्ठ तपासणी झाली आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी Pure Tone Audiometry (PTA), आवश्यकतेनुसार BERA आणि इतर संबंधित तपासण्यांचा आधार घेतला जातो. दोन्ही कानांची श्रवणक्षमता, वेगवेगळ्या ध्वनी वारंवारतांवरील श्रवणमर्यादा आणि लागू मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिव्यांगत्वाची टक्केवारी निश्चित केली जाते. मग ज्या व्यक्तींना श्रवणदोषाच्या आधारे ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले, त्यांच्या मूळ ऑडिओमेट्री अहवालांची स्वतंत्र पडताळणी का होऊ नये ? पूर्वीच्या चाचण्यांचे निष्कर्ष आणि नव्याने केलेल्या वैद्यकीय तपासणीचे निष्कर्ष यांची तुलना का करू नये ?
          अस्थिव्यंगाच्या बाबतीतही केवळ बाह्य स्वरूप पाहून दिव्यांगत्वाची टक्केवारी निश्चित होत नाही. एखाद्या व्यक्तीचा पाय थोडा तिरका असणे, चालताना किंचित फरक जाणवणे किंवा शरीराची ठेवण वेगळी असणे आणि प्रत्यक्ष हालचालींच्या कार्यक्षमतेत गंभीर मर्यादा असणे, या स्वतंत्र बाबी आहेत. वैद्यकीय मूल्यांकनात सांध्यांची हालचाल (Range of Motion), स्नायूंची ताकद (Muscle Strength), शरीराचा समतोल, हालचालींचे समन्वय आणि दैनंदिन क्रिया करण्याची क्षमता अशा विविध घटकांचा विचार केला जातो. म्हणूनच, एखादी व्यक्ती कार्यालयात सहजपणे चालताना दिसते म्हणून तिचे दिव्यांगत्व नाकारता येणार नाही. परंतु चालण्यातील किरकोळ दोषाच्या तुलनेत प्रमाणपत्रावर अत्यंत जास्त टक्केवारी नमूद केली असेल, तर त्या फरकाची तज्ज्ञ वैद्यकीय मंडळाकडून तपासणी होणे आवश्यक आहे. दिव्यांगत्वाची टक्केवारी ही अंदाजाने, ओळखीने किंवा शिफारशीने ठरत नाही. ती निर्धारित वैद्यकीय निकषांनुसार ठरते.
        दिव्यांगजन हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम २(आर) नुसार Benchmark Disability म्हणजे संबंधित निर्दिष्ट दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के प्रमाण असणे. कलम ३४ नुसार शासकीय आस्थापनांमध्ये Benchmark Disability असलेल्या व्यक्तींसाठी किमान ४ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. याचा अर्थ असा की ३० टक्के दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीला दिव्यांग व्यक्ती म्हणून कायद्याने मिळणारे सर्व हक्क नाकारले जात नाहीत मात्र ४० टक्क्यांचा निकष आवश्यक असलेल्या आरक्षणासाठी ती पात्र ठरत नाही. मग प्रश्न असा आहे की, ३० टक्के दिव्यांगत्व असताना एखाद्या व्यक्तीच्या प्रमाणपत्रावर ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व कसे नमूद झाले ? त्यासाठी कोणत्या वैद्यकीय चाचण्या झाल्या ? संबंधित अहवालांची फेरतपासणी झाली आहे का ? या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी केवळ प्रमाणपत्र पाहणे पुरेसे नाही. मूळ वैद्यकीय नोंदी, तपासणी अहवाल, वैद्यकीय मंडळाचे निष्कर्ष आणि UDID पोर्टलवरील नोंदी तपासाव्या लागतील.
          या विषयाला आता केवळ तक्रारींच्या चौकटीत ठेवता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने ६ मे २०२६ रोजी योगेश रामभाऊ आहेर व इतर संबंधित प्रकरणांमध्ये, एकत्रितपणे दाखल झालेल्या याचिकांवर महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. न्यायालयाने दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याचा शासनाचा अधिकार मान्य केला आहे. फेरतपासणी ही दिव्यांगजन हक्क अधिनियम, २०१६, २०१७ चे नियम आणि महाराष्ट्राचे २०२४ चे नियम यानुसार निर्धारित वैद्यकीय मंडळामार्फतच होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाने पुढील बाबी स्पष्ट केल्या आहेत
• कलम ५७ अंतर्गत अधिकृत नियुक्ती नसलेल्या प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र वैध मानता येणार नाही.
• दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आणि UDID कार्ड यांची केवळ वरवरची पडताळणी पुरेशी नाही.
• बोगस किंवा खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळविल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याला कायदेशीर संरक्षण मिळणार नाही.
• संबंधित कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस, सुनावणी आणि विभागीय चौकशीची प्रक्रिया पूर्ण करून सेवेतून काढण्याची कारवाई होऊ शकते.
• प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांचा गैरप्रकारातील सहभाग आढळल्यास सेवेत असलेल्या डॉक्टरांवर शिस्तभंगाची कारवाई आणि निवृत्त डॉक्टरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
• भविष्यातील भरतीमध्ये प्रमाणपत्र, UDID कार्ड आणि दिव्यांगत्वाची टक्केवारी यांची सखोल छाननी करूनच नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
         या निकालातील परिच्छेद ९५ ते १०१ विशेष महत्त्वाचे आहेत. मात्र, न्यायालयाने याच प्रकरणातील आधीच्या कर्मचाऱ्यांसाठी काही विशेष अंतरिम व संक्रमणकालीन निर्देशही दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात एकसारखी कारवाई होईल असे गृहीत धरता येणार नाही. 
         दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर करून Benchmark Disability साठी राखीव लाभ फसवणुकीने मिळविल्याचे सिद्ध झाल्यास दिव्यांगजन हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम ९१ अत्यंत महत्त्वाचे ठरते. या कलमानुसार, Benchmark Disability असलेल्या व्यक्तींसाठी राखीव लाभ फसवणुकीने मिळविणाऱ्या किंवा मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. याशिवाय, प्रकरणातील पुरावे आणि गुन्ह्याचे स्वरूप पाहून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील पुढील कलमांचाही विचार होऊ शकतो
१) ३१८ फसवणूक (Cheating)
२) ३३६ बनावट दस्तऐवज तयार करणे (Forgery)
३) ३४० बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे
४) ६१ गुन्हेगारी कट (Criminal Conspiracy)
           मात्र ही कलमे प्रत्येक प्रकरणाला सरसकट लागू होत नाहीत. खोटे दस्तऐवज तयार करणे, त्यांचा वापर, फसवणुकीचा हेतू आणि संबंधित व्यक्तींची भूमिका यांचे पुरावे आवश्यक आहेत.
           येथे आणखी एक गंभीर तपासाचा मुद्दा उपस्थित होतो. एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याने आर्थिक लाभ घेऊन चुकीचे प्रमाणपत्र दिल्याचा पुरावा मिळाल्यास, तसेच शासकीय अधिकाऱ्याने आर्थिक किंवा अन्य अनुचित लाभ स्वीकारून नियमबाह्य नियुक्तीला मदत केल्याचे सिद्ध झाल्यास, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७, ७-अ आणि प्रकरणानुसार इतर संबंधित तरतुदींचा विचार होऊ शकतो. परंतु केवळ नियुक्ती झाली किंवा प्रमाणपत्रात विसंगती आढळली म्हणून आर्थिक व्यवहार झाला असे सिद्ध होत नाही. त्यासाठी आर्थिक व्यवहारांचे पुरावे, संवाद, दस्तऐवज, निर्णयप्रक्रियेतील हस्तक्षेप आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासणे आवश्यक आहे. आता शासनाने या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करावी. प्रमाणपत्र देणारे वैद्यकीय अधिकारी, भरती प्रक्रिया राबविणारे अधिकारी आणि नियुक्तीला मंजुरी देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे.
           या विषयात आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे केंद्र सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी राजपत्र अधिसूचना काढून दिव्यांगत्वाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित केली आहेत. या अधिसूचनेने १४ मार्च २०२४ च्या मार्गदर्शक तत्त्वांची जागा घेतली आहे. यामध्ये अस्थिव्यंग, दृष्टिदोष, श्रवणदोष आणि अन्य निर्दिष्ट दिव्यांगत्वांचे मूल्यमापन करण्यासाठी तांत्रिक निकष दिले आहेत. विशेषतः अस्थिव्यंगामध्ये हालचालींची मर्यादा, स्नायूंची ताकद आणि कार्यक्षमतेचे मोजमाप यांना महत्त्व दिले आहे. म्हणजेच प्रमाणपत्रावरील टक्केवारी ही कोणाच्या वैयक्तिक मतावर नव्हे, तर निर्धारित वैद्यकीय पद्धतीवर आधारित असली पाहिजे. 
           आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न शासकीय प्रशासनाला विचारण्याची वेळ आली आहे. ज्या उमेदवारांना दिव्यांग आरक्षणातून शासकीय नोकरी देण्यात आली, त्यांच्या प्रमाणपत्रांची नियुक्तीपूर्वी पडताळणी कोणी केली ? संबंधित वैद्यकीय मंडळाचे अहवाल तपासले का ? UDID कार्डची अधिकृतता पडताळली का ? दिव्यांगत्वाची टक्केवारी संबंधित पदासाठीच्या पात्रतेशी जुळते का, याची खात्री केली का ? जर ही प्रक्रिया नियमांनुसार झाली असेल तर प्रशासनाने त्याचे पुरावे सार्वजनिक करावेत. आणि जर नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या झाल्या असतील तर त्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे. कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने आर्थिक व्यवहार केला आहे, असा पुरावा नसताना त्याच्यावर आरोप करणे योग्य नाही. परंतु आर्थिक व्यवहार झाला नाही, याची खात्री करण्यासाठीही स्वतंत्र तपास यंत्रणेने संशयास्पद प्रकरणांतील निर्णयप्रक्रिया, आर्थिक व्यवहार आणि अधिकृत नोंदी तपासल्या पाहिजेत. शेवटी प्रश्न केवळ प्रमाणपत्र घेणाऱ्या व्यक्तीचा नाही, तर त्या प्रमाणपत्राला शासकीय मान्यता देणाऱ्या संपूर्ण यंत्रणेचाही आहे.
          या प्रकरणात पुढील उपाययोजना तातडीने होणे आवश्यक आहे.
1) दिव्यांग आरक्षणातून नियुक्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या UDID कार्ड आणि मूळ प्रमाणपत्रांची अधिकृत पडताळणी करावी.
2) संशयास्पद प्रकरणांची राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मंडळामार्फत पुनर्तपासणी करावी.
3) दृष्टीदोष, श्रवणदोष आणि अस्थिव्यंग अशा प्रत्येक प्रवर्गासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असावा.
4) मूळ ऑडिओमेट्री, दृष्टीक्षमता, दृश्य क्षेत्र, एक्स-रे, आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि कार्यक्षमतेच्या नोंदींची तुलना करावी.
5) प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय मंडळातील सदस्यांची जबाबदारी निश्चित करावी.
6) नियुक्तीच्या वेळी प्रमाणपत्रांची पडताळणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका तपासावी.
7) बनावट प्रमाणपत्र किंवा जाणूनबुजून वाढविलेली दिव्यांगत्वाची टक्केवारी सिद्ध झाल्यास नियमानुसार सेवा समाप्ती, फसवणुकीने मिळविलेल्या लाभांबाबत कारवाई आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा.
8) खऱ्या दिव्यांग उमेदवारांना झालेल्या अन्यायाची दखल घेऊन संबंधित भरती प्रक्रियेतील रिक्त जागा आणि पात्रतेच्या प्रश्नांचे कायदेशीर निराकरण करावे.
           शासकीय नोकरी मिळविण्यासाठी अनेक पात्र दिव्यांग उमेदवार वर्षानुवर्षे अभ्यास करतात. आर्थिक परिस्थितीशी झुंज देतात. शारीरिक मर्यादांवर मात करतात. स्पर्धा परीक्षांना सामोरे जातात. गुणवत्ता असूनही संधी मिळत नसल्याने त्यांचे आयुष्य संघर्षात जाते. आणि दुसरीकडे, जर काही व्यक्तींनी वैद्यकीय प्रमाणपत्रांमधील कथित फेरफाराच्या आधारे राखीव जागा मिळविल्या असतील, तर तो केवळ नियमांचा भंग नाही तर तो एका पात्र दिव्यांग उमेदवाराच्या भविष्यावर झालेला अन्याय आहे. ज्या हातांनी दिव्यांगांना न्याय द्यायचा आहे, त्याच हातांनी जर चुकीच्या प्रमाणपत्रांना मान्यता दिली असेल, तर त्या व्यवस्थेची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. दिव्यांगत्वाचा गैरवापर करणाऱ्यांना पाठीशी घालणारी कोणतीही व्यवस्था लोकशाहीच्या न्यायमूल्यांशी प्रामाणिक राहू शकत नाही. खऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्यांना सहानुभूतीची ढाल नको, तर कायद्याचा धाक हवा आहे. शासनाने आता केवळ प्रमाणपत्रांची पडताळणी करून थांबू नये तर प्रमाणपत्रापासून नियुक्तीपर्यंतच्या संपूर्ण साखळीची चौकशी करावी. कारण बोगस प्रमाणपत्रधारक दोषी असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पण त्यांना पात्र ठरविणाऱ्या व्यवस्थेतील दोषीही कायद्याच्या कक्षेबाहेर राहता कामा नयेत. दिव्यांगांच्या आरक्षणावर डल्ला मारणाऱ्यांचे संरक्षण नव्हे, तर खऱ्या दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण हीच शासनाची खरी सामाजिक बांधिलकी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes