Breaking : bolt
निढोरीच्या वळणावर मृत्यूचा सापळा ! भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यूआरोग्यमंत्र्यांपेक्षाही कोल्हापुरातील जिल्हा स्टोअरचा औषध निर्माण अधिकारी ठरला पॉवरफुल्ल..?सेवा - वाढ कोणासाठी ? खुर्ची वाचवण्यासाठी की प्रशासन वाचवण्यासाठी ?औषधाच्या नावात ‘+’... पण रुग्णाच्या जीवाला ‘मायनस’ ?देवीच्या नावाचा महामार्ग, पण पत्रादेवीत वास्तव काय ? रासपचे युवा प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्नदोडामार्गच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष विस्ताराचा निर्धार“उपसंचालक साहेब, तुमच्या परिमंडळाचा हिशेब द्या ! तक्रारी किती, चौकशा किती, टेंडर किती अन् कारवाई किती ?”नांदेड " झेडपी " त टेंडरची फाईल धावली, RTI ची माहिती सहा महिने रेंगाळली !जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या शुभेच्छा... अन् कोल्हापुरात फार्मासिस्टच बदनाम ?सावधान ! तापाची गोळीच ‘ताप’ वाढवणारी ठरली ? बीपीची गोळीही चाचणीत नापास, FDA कडून संशयित साठा जप्त

जाहिरात

 

निढोरीच्या वळणावर मृत्यूचा सापळा ! भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

schedule10 Oct 26 person by visibility 27 categoryमहाराष्ट्रक्राइम न्यूजकोल्हापूर

सुशांत पोवार (अपघात वृत्त) - मुरगूड–मुदाळतिट्टा मार्गावरील निढोरी पुलाजवळील वळण पुन्हा एकदा जीवघेण्या अपघाताने रक्तरंजित झाले. तामिळनाडूहून गोव्याच्या दिशेने जाणारा भरधाव दहा चाकी कंटेनर पलटी झाला आणि समोरून येणारा दुचाकीस्वार त्याखाली सापडला. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत दुचाकीस्वार चंदगड तालुक्यातील अडकूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.
          मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूहून आलेला दहा चाकी मालवाहू कंटेनर निपाणीमार्गे निढोरी येथून गोव्याच्या दिशेने जात होता. निढोरी पुलापुढील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन पलटी झाला. याचवेळी समोरून येणारा दुचाकीस्वार कंटेनरखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. कंटेनरखाली अडकलेल्या दुचाकीस्वारामुळे बचावकार्य आणि वाहतूक सुरळीत करण्याचे आव्हान निर्माण झाले. दुपारपर्यंत क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला करण्यात आला. शनिवारची अमावस्या असल्याने संत बाळूमामा मंदिराकडे जाणाऱ्या भक्तांची या मार्गावर मोठी वर्दळ होती. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुरगूडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रयत्न करावे लागले.
          या अपघाताने केवळ एका दुचाकीस्वाराचा जीव घेतला नाही, तर मुरगूड–निढोरी मार्गावरील अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. स्थानिकांकडून व्यक्त होणाऱ्या चिंतेनुसार, कोगनोळी टोलनाका टाळण्यासाठी अनेक अवजड वाहने मुरगूडमार्गे निढोरीतून कागलच्या दिशेने जात असल्याचे सांगितले जाते. कागल येथील चेकपोस्टवर ओव्हरलोड वाहनांवर दंडात्मक कारवाई होत असल्याने हा दंड आणि कोगनोळी टोल टाळण्यासाठी काही वाहनचालक पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. मात्र, या विशिष्ट अपघातामागे टोल चुकवणे किंवा ओव्हरलोडिंग हे कारण होते, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. प्रश्न असा आहे की, या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची ? वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमित कारवाई होते का ? आणि वारंवार अपघातांचा धोका निर्माण होत असेल, तर धोकादायक वळणांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कधी होणार ? मुरगूड–निढोरी मार्गावर संत बाळूमामा मंदिर असल्याने वर्षभर भाविकांची ये-जा सुरू असते. विशेषतः अमावस्या आणि यात्रेच्या काळात या मार्गावर पादचारी, दुचाकीस्वार आणि भाविकांची संख्या वाढते. अशा मार्गावर अवजड वाहनांची बेफाम वर्दळ सुरू राहिली, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो.
            आजच्या दुर्घटनेनंतर प्रशासनासमोर काही थेट प्रश्न उभे राहिले आहेत. निढोरी परिसरातील अपघातप्रवण वळणांची पाहणी झाली आहे का ? अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ठोस उपाययोजना आहेत का ? ओव्हरलोड वाहनांची तपासणी किती प्रभावीपणे होते ? तसेच कोगनोळी टोलनाका टाळण्यासाठी पर्यायी मार्ग वापरला जात असल्याच्या स्थानिक तक्रारींची चौकशी होणार का ? एका अपघातानंतर पंचनामा, वाहतूक सुरळीत आणि नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे असेच सुरू राहणार असेल, तर नागरिकांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार ? या मार्गावरील अवजड वाहनांच्या वर्दळीची वस्तुस्थिती तपासून वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि संबंधित प्रशासनाने संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. धोकादायक वळणांवर आवश्यक सुरक्षा उपाय, वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणि ओव्हरलोडिंग विरोधात नियमित तपासणी यांसारख्या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे.
         निढोरीच्या वळणावर झालेला हा मृत्यू केवळ अपघाताची नोंद म्हणून फाईलमध्ये बंद होणार, की अवजड वाहनांच्या वर्दळीमागील कारणांचा शोध घेऊन ठोस कारवाई होणार? हा प्रश्न आता प्रशासनाला टाळता येणार नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes