Breaking : bolt
NABL च्या शिक्क्याआड संशयाचे जाळे, CBI तपासातून उघडू द्या सत्याचे ताळे...गोळीच्या नावाखाली विषाचा व्यापार, रुग्णांच्या जिवाशी कोणाचा व्यवहार ? सत्तेचा वरदहस्त की भ्रष्टाचाराचे जाळे, CBI चौकशीतच उघडतील गैरव्यवहाराचे ताळे...बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा पर्दाफाश, नियुक्ती देणारे अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात..?लेखणीला दाबण्याचे षड्यंत्र, अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमतेची परीक्षा आणि औषध खरेदीतील अनुत्तरित प्रश्न...कोल्हापूरच्या औषध खरेदीसाठी ₹४.५० कोटींच्या निविदा प्रक्रियेत सर्व पात्र कंपन्यांना समान संधी मिळणार का..?प्रसूतीचा नैसर्गिक मार्ग की शस्त्रक्रियेचा वाढता बाजार ? खासगी रुग्णालयांतील ५९ टक्के सिझेरियनने आरोग्य व्यवस्थेसमोर उभे केले गंभीर प्रश्नमहानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरतीत ‘पिक अँड चूज’चा आरोप, पात्र अधिकाऱ्यांवर अन्याय ?२५५ कंपन्यांच्या निविदेत केवळ दोनच पात्र, आरोग्य विभागाच्या ४,५०० कर्मचाऱ्यांच्या भरतीला हायकोर्टाची स्थगिती, १४.८५ टक्के सेवा शुल्काचा संशयास्पद पेचआरोग्य विभागाचा कारभार रुग्णांच्या जिवावर बेतणारा ठरत आहे...?कुंभमेळ्यासाठी कोट्यवधींचा निधी, पण आदिवासींच्या डायलिसिसला टाळे

जाहिरात

 

NABL च्या शिक्क्याआड संशयाचे जाळे, CBI तपासातून उघडू द्या सत्याचे ताळे...

schedule28 Nov 26 person by visibility 29 categoryमहाराष्ट्रराजकीय घडामोडीक्राइम न्यूजसंपादकीयआरोग्य विभाग

सुशांत पोवार (विशेष वृत्त) - औषध म्हणजे केवळ बाजारात विक्रीसाठी तयार केलेली वस्तू नव्हे, तर एखाद्या रुग्णाच्या जगण्याची शेवटची आशा असते. डॉक्टरांनी लिहून दिलेली गोळी रुग्णाच्या हातात जाते, तेव्हा त्या गोळीच्या गुणवत्तेवर तो डोळे झाकून विश्वास ठेवतो. सरकारी रुग्णालयात मिळणारे औषध असेल तर हा विश्वास आणखी दृढ असतो कारण ते औषध शासनाच्या खरेदी प्रक्रियेतून आलेले असते, त्याची तपासणी झालेली असते, त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली असतात, असा सामान्य नागरिकाचा समज असतो. परंतु या संपूर्ण प्रक्रियेतील गुणवत्ता तपासणीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर हा केवळ औषध पुरवठ्यातील अनियमिततेचा विषय राहत नाही तर तो सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या नैतिक अधिष्ठानाला हादरा देणारा गंभीर विषय ठरतो. शासनाने औषधांच्या प्रत्येक बॅचसोबत NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल सादर करण्याची अट ठेवली, त्यामागील उद्देश स्पष्ट होता की औषधांचा दर्जा कागदोपत्री नव्हे, तर प्रयोगशाळेतील वैज्ञानिक परीक्षणातून निश्चित व्हावा. मात्र आता याच व्यवस्थेतील एका संभाव्य हितसंबंधाच्या संघर्षाने नवा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित केला आहे. ज्या उत्पादकांच्या औषधांचा दर्जा तपासला जातो, त्याच उत्पादकांच्या मालकीच्या किंवा नियंत्रणाशी संबंधित प्रयोगशाळांमधून तपासणी अहवाल तयार होत असतील, तर त्या अहवालांच्या निष्पक्षतेची खात्री कोण आणि कशी करणार ? हा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे कोणत्याही प्रयोगशाळेला किंवा उत्पादकाला आधीच दोषी ठरविणे नव्हे तर रुग्णांच्या जीवाशी संबंधित व्यवस्थेत संशयाची प्रत्येक जागा पारदर्शक तपासणीने बंद करणे, ही शासनाची घटनात्मक आणि प्रशासकीय जबाबदारी अधोरेखित करणे होय.
          NABL म्हणजे National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories. ही केवळ एखाद्या प्रयोगशाळेला दिलेली प्रतिष्ठेची पाटी नाही. विशिष्ट परीक्षणांसाठी प्रयोगशाळेची तांत्रिक क्षमता, गुणवत्ता व्यवस्थापन, निष्पक्षता आणि कार्यपद्धती यांचे मूल्यांकन करून मान्यता देणारी ही यंत्रणा आहे. मात्र येथे एक मूलभूत फरक समजून घेणे अत्यावश्यक आहे. NABL मान्यता म्हणजे त्या प्रयोगशाळेने केलेल्या प्रत्येक परीक्षणाचा निकाल अचूकच असेल, प्रत्येक बॅच निर्दोषच असेल किंवा त्या प्रयोगशाळेच्या प्रत्येक अहवालाला कायमस्वरूपी निर्विवाद हमी प्राप्त झाली आहे, असा त्याचा अर्थ नाही. NABL च्या स्वतःच्या अद्ययावत अटींमध्येही मान्यता ही तांत्रिक क्षमता आणि व्यवस्थापन व्यवस्थेची पुष्टी असल्याचे स्पष्ट केले आहे. ती प्रत्येक अहवालाची हमी किंवा प्रयोगशाळेला व्यवसाय करण्याचा परवाना नाही. एवढेच नव्हे, तर प्रयोगशाळेने स्वतःची मालकी, संस्थात्मक रचना, आर्थिक माहिती आणि संभाव्य हितसंबंधांबाबत माहिती देणे, तसेच हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे अपेक्षित आहे. मग औषध उत्पादक आणि परीक्षण प्रयोगशाळा यांच्यात मालकी, भागीदारी, आर्थिक व्यवहार, व्यवस्थापकीय नियंत्रण अथवा अन्य कोणतेही व्यावसायिक संबंध असतील, तर त्यांची वस्तुनिष्ठ पडताळणी होणे अपरिहार्य नाही काय ? मान्यतेचा शिक्का हा निष्पक्षतेचा पर्याय नाही तर निष्पक्षता ही प्रत्यक्ष व्यवहारातून सिद्ध व्हावी लागते. अन्यथा गुणवत्ता नियंत्रणाच्या नावाखाली कागदपत्रांची देवाणघेवाण सुरू राहील आणि औषधांच्या गुणवत्तेचा मूळ प्रश्न मात्र अनुत्तरितच राहील.
           या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे उत्पादकांनी स्वतःच्या प्रयोगशाळा उभारून त्यांना NABL मान्यता मिळविली असल्याच्या तक्रारी आणि त्यातून निर्माण झालेला संशय. या प्रयोगशाळांनी दिलेले अहवाल शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये औषध पुरवठ्याच्या वेळी सादर झाले आहेत काय, झाले असल्यास किती औषधांच्या बॅचचे परीक्षण अशा प्रयोगशाळांमध्ये झाले, त्या प्रयोगशाळांच्या मालकीची वास्तविक रचना काय आहे, त्यांचे संचालक आणि औषध उत्पादक यांच्यात कोणते व्यावसायिक संबंध आहेत, तसेच संबंधित परीक्षणासाठी प्रत्यक्ष नमुने कोणी घेतले आणि ते प्रयोगशाळेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचले, या प्रश्नांची उत्तरे आता कागदोपत्री नव्हे, तर स्वतंत्र तपासातून मिळाली पाहिजेत. एखाद्या उत्पादकाने स्वतःच्या औषधांची तपासणी स्वतःच्या नियंत्रणाखालील प्रयोगशाळेत केली, म्हणून तो आपोआप दोषी ठरत नाही तर परंतु अशा परिस्थितीत परीक्षणाची निष्पक्षता, नमुन्यांची सत्यता, परीक्षणाची व्याप्ती आणि अहवालाच्या विश्वासार्हतेची स्वतंत्र खातरजमा न करता केवळ NABL क्रमांक पाहून शासनाने औषधांचा स्वीकार केला असेल, तर त्या स्वीकार प्रक्रियेचेही परीक्षण झाले पाहिजे. प्रश्न प्रयोगशाळा खासगी आहे की सरकारी, हा नाही तर प्रश्न असा आहे की परीक्षण करणारी संस्था संबंधित उत्पादकाच्या प्रभावापासून प्रत्यक्षात किती स्वतंत्र होती ?
            औषधांच्या एका बॅचचा अहवाल तयार होतो, त्यावर निर्धारित चाचण्यांचे निष्कर्ष नोंदविले जातात आणि त्या अहवालाच्या आधारे औषध सरकारी रुग्णालयांच्या साठ्यात दाखल होते. या प्रवासात एखादी चूक झाली, परीक्षणात तडजोड झाली किंवा अहवाल आणि प्रत्यक्ष औषध यांच्यात तफावत राहिली, तर त्याची किंमत एखाद्या पुरवठादाराला आर्थिक स्वरूपात मोजावी लागत नाही तर ती किंमत रुग्णाला त्याच्या आरोग्याने, उपचारांच्या अपयशाने आणि कधी कधी प्राणाने मोजावी लागू शकते. म्हणूनच बॅच रिपोर्ट हा पुरवठ्याच्या कागदपत्रांमधील एक औपचारिक सोपस्कार मानून चालणार नाही. तो औषधाच्या गुणवत्तेचा महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा आहे. त्यामधील प्रत्येक नोंद, प्रत्येक परीक्षण निष्कर्ष, प्रत्येक नमुन्याची ओळख आणि प्रत्येक स्वाक्षरी तपासण्यायोग्य असली पाहिजे. अहवाल सादर झाला म्हणजे औषध सुरक्षित झाले, अशी प्रशासकीय समजूत म्हणजे गुणवत्ता नियंत्रणाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यासारखे आहे.
          याहून चिंताजनक बाब म्हणजे, जर एकाच उत्पादकाच्या नियंत्रणाखालील प्रयोगशाळेने तयार केलेले अहवाल अनेक सरकारी आस्थापनांमध्ये स्वीकारले गेले असतील, तर या प्रकरणाची व्याप्ती एका औषधाच्या बॅचपुरती किंवा एका जिल्ह्यापुरती मर्यादित राहणार नाही. संबंधित प्रयोगशाळांमधून परीक्षण झालेल्या सर्व औषधांच्या बॅचचा मागोवा घ्यावा लागेल. कोणत्या कालावधीत कोणत्या उत्पादकाने कोणती औषधे पुरविली, कोणत्या सरकारी खरेदी आदेशांतर्गत पुरवठा झाला, कोणत्या प्रयोगशाळेने त्यांचे परीक्षण केले, त्या प्रयोगशाळेची मान्यता त्या विशिष्ट परीक्षणासाठी वैध होती काय, अहवालातील परीक्षण पद्धती आणि निकाल मूळ नोंदींशी जुळतात काय, तसेच औषधांच्या प्रत्यक्ष साठ्यातील नमुने अहवालातील नमुन्यांशी संबंधित आहेत काय, या सर्व बाबींची साखळीवार तपासणी झाली पाहिजे. केवळ बॅच रिपोर्टच्या छायाप्रती तपासून हा प्रश्न सुटणार नाही. मूळ प्रयोगशाळा नोंदवही, उपकरणांमधील डिजिटल डेटा, क्रोमॅटोग्राम, कच्चे परीक्षण निष्कर्ष, वापरलेली संदर्भ मानके, नमुना स्वीकारल्याच्या नोंदी, परीक्षणाची तारीख, अहवाल जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांची पात्रता आणि संबंधित आर्थिक व्यवहार यांचीही पडताळणी आवश्यक आहे. कारण कागदावर योग्य दिसणारा अहवाल आणि प्रत्यक्षात वैज्ञानिक पद्धतीने झालेली चाचणी या दोन भिन्न गोष्टी आहेत.
           याच पार्श्वभूमीवर मंगळवारी संबंधित उत्पादकांच्या प्रयोगशाळांमधून परीक्षण झालेल्या आणि शासकीय आस्थापनांमध्ये पुरवठा केलेल्या औषधांच्या सर्व बॅच रिपोर्ट्सची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे. ही मागणी केवळ एखाद्या कंपनीविरोधातील कारवाईची मागणी म्हणून पाहणे हा या प्रश्नाचा संकुचित अर्थ लावण्यासारखे होईल. उलट, शासनाच्या औषध खरेदी व्यवस्थेतील विश्वासार्हता टिकविण्यासाठी, संभाव्य गैरव्यवहाराची पाळेमुळे शोधण्यासाठी आणि निरपराध उत्पादकांना संशयाच्या सावटातून मुक्त करण्यासाठीही स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे. या मागणीमध्ये सर्वप्रथम संबंधित प्रयोगशाळांची संपूर्ण यादी, त्यांचे NABL प्रमाणपत्र क्रमांक, मान्यतेची वैधता, मान्यताप्राप्त परीक्षणांची व्याप्ती, मालकी व संचालक मंडळाची माहिती, उत्पादकांशी असलेले संबंध आणि त्यांच्याकडून तयार झालेल्या अहवालांवर आधारित शासकीय औषध पुरवठ्याचा संपूर्ण तपशील तपासण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर संबंधित बॅचचे उपलब्ध नमुने स्वतंत्र, हितसंबंध नसलेल्या सरकारी किंवा अन्य पात्र प्रयोगशाळांमध्ये पुनर्तपासणीसाठी पाठविण्यात यावेत. ज्या औषधांबाबत दर्जाविषयी ठोस शंका निर्माण होईल, त्यांचा पुरवठा, वितरण आणि वापर याबाबत सक्षम औषध नियंत्रक प्राधिकरणाने कायद्यानुसार तातडीने निर्णय घ्यावा. रुग्णालयांमध्ये औषध उपलब्धता खंडित होणार नाही, याची काळजी घेतानाच संशयित औषधांच्या वापरातून रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू नये, ही दुहेरी जबाबदारी प्रशासनाने पार पाडली पाहिजे.
            या संदर्भात मध्य प्रदेशातील शासकीय औषध खरेदी व्यवस्थेतील एक महत्त्वाचा न्यायालयीन संदर्भही दुर्लक्षित करता येणार नाही. २० जुलै २०२६ रोजीच्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयात संबंधित निविदेतील अट उद्धृत करण्यात आली असून, औषधांच्या प्रत्येक बॅचचा विश्लेषण अहवाल उत्पादकाच्या मालकीच्या नसलेल्या तृतीय-पक्ष NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून सादर करण्याची तरतूद त्यात नमूद आहे. हा निर्णय महाराष्ट्राला आपोआप लागू होणारा आदेश नाही परंतु औषध परीक्षणातील हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी खरेदी यंत्रणा कोणत्या प्रकारची संरक्षक अट घालू शकते, याचे तो महत्त्वाचे उदाहरण आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागानेही या संदर्भाचा अभ्यास करून निविदा अटी, गुणवत्ता तपासणीची पद्धत आणि पुरवठा स्वीकारण्याची प्रक्रिया अधिक कठोर करण्याची गरज आहे. शासनाच्या तिजोरीतून खरेदी होणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेबाबत केवळ पुरवठादाराने दिलेल्या अहवालावर अवलंबून राहणे पुरेसे नाही तर स्वतंत्र पडताळणीची संस्थात्मक हमी उभी राहिली पाहिजे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes