सुशांत पोवार (संपादकीय) - तीन पोलीस अधिकारी काही आंदोलकांना घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तीनही पोलिसांनी त्या आंदोलकांना एकदम व्यवस्थित पकडले होते. कोणी एकाच्या गचांड्या पकडल्या आहेत तर कोणी एकाला मागून पॅक केलेले दिसत आहे. तर तिसऱ्याने एकाच्या हातांना घट्ट पकडून ठेवले जेणे करून ते तावडीतून सुटणार नाहीत. हे तीनही पोलीस त्या लोकांना घेऊन जात असताना अचानक तावातावात मागून "डीवायएसपी अनंत कुलकर्णी" येतात आणि त्या आंदोलकांच्या पार्श्व भागावरती जीव खाऊन लाथ घालतात. त्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर त्या डीवायएसपी अनंत कुलकर्णींनी त्यावर स्पष्टीकरण पण दिले आहे. ते म्हणतात आंदोलक आत्मदहनाचा प्रयत्न करणार होते म्हणून आम्हाला बळाचा वापर करावा लागला. पण प्रश्न असा पडतो की जर तीन-तीन पोलिसांनी त्या आंदोलकांना अगदी व्यवस्थित ताब्यात घेतले असेल तर हे डीवायएसपी अनंता कुलकर्णींना तावातावात येऊन त्या माणसाला लाथाडायची काय गरज होती ? जर खुलेआम पोलीस अशा पद्धतीने वागत असतील तर त्या अंधाऱ्या कोठडीत नेमके काय काय होत असेल ? इकडे आपल्या बायकोला माघारी आणावे यासाठी गेल्या महिनाभरापासून उपोषणाला बसलेल्या त्या आंदोलकाला भर रस्त्यात पोलीस लाथडत आहेत. तिकडे ज्याच्यावरती ४३ जबर गुन्हे दाखल आहेत, ज्याला फरार म्हणून घोषित केले आहे. पण असतो तो पोलिसांच्याच आसपास अशा गीतेपर्यंत मात्र पोलीस पोहोचत नाहीत. याला नेमके काय म्हणायचे.......?
जो व्हिडीओ व्हायरल झाला त्यामध्ये ज्याला पोलीस पकडून घेऊन जात आहेत तो जालना जिल्ह्यातला चौधरी नावाचा एक व्यक्ती आहे. त्याने एका कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. पण पोलिस ढिम्म, त्याची दखल घेतली गेली नाही. गेल्या महिनाभर तो उपोषण करत असल्याचे स्थानिक मीडिया रिपोर्ट सांगतो, तर मागच्या महिन्याभरापासून पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादींना त्रास देत असल्याचा आरोप या अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी यांनी केला आहे. हे दोघे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करत आहेत. त्यातच शुक्रवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदन करायला आलेल्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर तो आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणार होता. त्यात त्याला पोलिसांनी उचलून घेऊन गेले पण घेऊन जात असताना या पोलीस उपधीक्षक अनंत कुलकर्णी यांचे वर्तन बघा, हे असे फिल्मी स्टाईल वर्तन माणुसकीच्या कोणत्या व्याख्येत बसत असेल बरं, हा एवढा कसला राग की मागून धावत येत अगदी फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कमरेत लात घालावी लागली.
यावर गृहखाते या अशा पोलीस अधिकाऱ्यांवरती काही ऍक्शन घेईल का ? याची मला निर्भीड पोलीस टाइम्सचा संपादक म्हणून तरी शक्यता वाटत नाही, पण हे असे निगरगट्ट मुजोर असंवेदनशील पोलीस सगळीकडे ढिगाणे भरले आहेत. जे खऱ्या अर्थाने संपूर्ण यंत्रणेला काळीमा फासण्यासारखे आहेत. यावर आता त्या लाथाडणाऱ्या उपविभागीय पोलीस अधीक्षक कुलकर्णींनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेले आहे. ते म्हणतात की आंदोलकाच्या पत्नीने दुसरं लग्न केल्यामुळे पत्नीला माघारी आणून देण्याच्या मागणीसाठी गोपाल चौधरी मागच्या काही दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांची अनेक वेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र इतके करून देखील आज म्हणजेच काल पंकजाताई मुंडे दौऱ्यात येत असताना त्यांनी अंगावरती रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर सुद्धा रॉकेल टाकले, म्हणून या पोलीस अधिकाऱ्यांना त्या लोकांना ताब्यात घ्यावे लागले. ज्याच्यासाठी त्यांनी बळाचा वापर केलेला आहे असे अनंत कुलकर्णी म्हणाले आहेत. पण यातही प्रश्न असा पडतो की जर तीन-तीन पोलिसांनी त्यांना व्यवस्थित ताब्यात घेतले असतना अशा पद्धतीने उडी मारून लात घालण्याची काय गरज होती ? यातही त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी सुद्धा दिसते जिला सुद्धा त्या पोलिसांनी पकडले आहे. आता ही जर त्यांचीच मुलगी असेल तर तिला तिला नेमकके काय वाटत असेल ? तिच्या मनात त्या पोलिसांबद्दल त्या क्षणी कोणती इमेज तयार झाली असेल ? असे सगळेच प्रश्न आहेत.
एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे. जर हे पोलीस अशा पद्धतीने भर रस्त्यात लोकांसोबत वागत असतील तर त्या अंधाऱ्या खोलीत नेमके कसे वागत असतील ? यावर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सुद्धा आपल्या पोस्ट मधून संताप व्यक्त केला आहे. ते म्हणतात हे झाले रस्त्यावर पण त्या अंधऱ्या कोठडीमध्ये आजपर्यंत अनेकांना जी मारहाण झाली ती चर्चा कधी होईल. आता मुद्दा हा आहे की पोलिसांचा पारंपरिक बाज बदलून त्यांना जबाबदार कसे बनवायचे ? त्यांचे गरीब लोकांशी असलेले वागणे कसे बदलायचे ? असे म्हणत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कसा झालेला असेल याची झलक यातून दिसते आणि हाच पुरावा सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येचा आहे. अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे. या व्यतिरिक्त या घटनेचा व्हिडिओ शेअर करत आमदार रोहित पवार यांनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे. खून, लैंगिक अत्याचार, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस लाथा घालत असतील तर एक वेळ मान्य करता येईल, पण महिनाभर उपोषण करून सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या कंबरड्यामध्ये डीवायएसपी अनंत कुलकर्णी नावाचा अधिकारी अगदी फिल्मी स्टाईलने लात घालत असेल तर हा विकृतीचा कळस आहे. याची गंभीर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकाला सुद्धा न्याय द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. तर प्रहारचे बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा थेट भाजप मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या समजपणावरच हल्ला चढवला आहे. त्यांनी डीवायएसपी अनंत कुलकर्णींच्या रुणावरती लाथ कशी बसवायची ? याबाबत सूचक असा इशारा दिला आहे. बच्चूभाऊ कडू यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्या डीवायएसपीचे काही खरे नाही अशी चर्चा सगळीकडे होती आहे.
एकीकडे पोलीस या आंदोलकाला अशा पद्धतीने वागवत आहेत, तर दुसरीकडे ज्याच्यावरती ४३ गुन्हे दाखल आहेत अशा गीतेला मात्र पोलीस पकडू शकले नाहीत. त्यांनी त्याला फरार घोषित केले आहे. विशेष म्हणजे गीते फरार असून सुद्धा तो त्याच पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करत असतो. मागच्या दोन दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडला सीआयडीचे अधिकारी पुण्याहून ज्यावेळेस बीडला घेऊन जात होते त्यावेळेस गीतेने पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केले होता. त्याचा व्हिडिओ सुद्धा शूट केलेला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला आहे. याच गीते विरुद्ध जिल्ह्यासह इतर ठिकाणी ४३ गुन्हे दाखल असून त्याच्यावरती "मकोका" सारखी कठोर कारवाई सुद्धा आहे, तरी सुद्धा पोलिसांच्या गाडीजवळ पोलिसांसोबत फिरण्याचे धाडस त्याने केले आहे. हा गंभीर प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. बाकी पोलीस यंत्रणा सुद्धा गरीब आणि श्रीमंत बघून पुढचा व्यवहार ठरवतात का ? असे आता नागरिकांना वाटू लागले आहे............