सुशांत पोवार (विशेष वृत्त) - एकनाथ शिंदेच्या नाराजीने महायुतीत निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस व्यापक स्वरूप घेत आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महायुती एकत्र लढण्याच्या तयारीत असताना अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरचे राजकारण पेटून उठले आहे. आता कोकणातील राजकीय परिस्थिती महायुतीच्या डोक्याला आणखी नवाा ताप होतेय. कोकणातील भाजप आणि शिंदेच्या दोन बड्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिल्याने आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीची परिस्थिती नेमकी कशी असणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. फडणविसांचे निकटवर्तीय राणे आणि शिंदेचे निकटवर्तीय असलेल्या सामंतांनी कोकणात स्वबळाचा नारा दिल्याने आता खळबळ उडाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सध्या सुरू झाली आहे. सगळ्याच पक्षांनी या तयारीला सुरुवात केली आहे. पण एकीकडे सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली असताना दुसरीकडे कोकणात मात्र महायुतीमध्ये कलगी तुरा रंगला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या प्रमुख जिल्ह्यांमध्ये भाजप आणि शिवसेना आमने-सामने आली असून आगामी निवडणुकांच्या तोंडावर महायुतीवरचंं प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केवळ स्थानिक नेते नव्हे तर इथल्या दोन्ही पालकमंत्र्यांनी देखील स्वतंत्र लढण्याच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांमुळे जिल्ह्यातील राजकारण अर्थातच ढवळून निघाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे कोकणातील महत्त्वाचे नेते आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीत जाऊन स्वबळाचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचा योग्य सन्मान ठेवला नाही तर आमचीही स्वतंत्र लढण्याची ताकद असल्याचा इशारा राज्याचे उद्योगमंत्री कोकणातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आणि तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेले आहे. यामुळे कोकणामध्ये महायुतीमध्ये कलगी तूरा रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आता प्रश्न असा आहे की या संघर्षाला किंवा या वादाला नेमकी सुरुवात कशी झाली ? तर कोकणामध्ये सुरुवातीपासूनच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये काही ना काही प्रमाणामध्ये वाद होते पण शिंदेच्या गोगावलेंनी हा वाद आणखी पेटवला आहे. भरत गोगावलेंनी नारायण राणे यांचे वर जेल, भांडण आणि हत्या या संदर्भातील जे काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्यामुळे अर्थातच राणे तापले आणि कोकणामध्ये कसे आपलेच वर्षस्व अधिक आहे हे सांगण्यासाठी आता राणे पेटून उठले आहेत. म्हणूनच कुठेतरी हे सिद्ध करण्यासाठी आता नितेश राणे यांनी ही स्वबळाची घोषणा केलेली दिसते. शिंदेच्या उदय सामंत यांनी सुद्धा मानापमानाचा मुद्दा काढत स्वबळाची भाषा केलेली दिसते, पण या सगळ्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये आता महायुतीच्या डोक्याला ताप होणार आहे का ? हा मुद्दा आता स्थानिक स्वराज्य संस्थांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर रत्नागिरीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसोबतच चार वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभेसाठी सुद्धा आत्ताच दावेदार तयार झाले आहेत. तशा घोषणा सुद्धा दोन्ही पक्षांकडून होत आहेत. खरतर हे थोडसं कठीण आहे. पाहायला गेले तर वेगळा लढण्याचा जो काही विषय आहे तो काही फारसा वाईट नाही. वेगळे लढल्याने जागांचे विभाजन टळू शकते त्यामुळे जास्तीत जास्तीत जास्त जागा लढवण्याची संधी ही प्रत्येक पक्षाला मिळू शकते. निवडणुकांनंतर पुन्हा एकत्र येण्याचा ऑप्शन सुद्धा आहेच त्यामुळे स्वबळाचा नारा देणे किंवा स्वबळाने लढणे हा फार धोकादायक निर्णय नाही असे आपण म्हणायला गेले तरी सुद्धा धोकादायक एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांची मन दुरावणे. निश्चितच त्याचा या निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसू शकतो.
राणे हे अपमान घेणारे नेते नाहीत तर उलट दस पटीने त्याची परत फेड करणारे नेते म्हणून राणे यांची ओळख आहे. हे कधीही विसरून चालणार नाही त्यामुळे राणेंना दुखावणे हे या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला महागात पडणार का ? आधीच शिंदेची शिवसेना ही अनेक गोष्टींमुळे अडचणीत, कसाट्यात सापडलेली आहे. अशावेळी आता राणेंना डिवचणे कोकणामध्ये शिंदेच्या शिवसेनेला परवडणार आहे का ? शिवाय सामंतांची ही ताकद कुठेही कमी लेखत नाही आहोत. त्यामुळे कशा पद्धतीने हे राणे आणि सामंत कोकणातील महायुतीतले वातावरण बदलणार आहेत ते पाहने आता येत्या काळात महत्त्वाचे ठरेल.