मुली शिकल्या, आधुनिक झाल्या म्हणजे नेमकं काय बदललं ?
schedule25 May 25
person by
visibility 235
categoryपुणे
संपादकीय - तीन ते चार दिवसापासून त्या वैष्णवीच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल वाचतोय, ऐकतोय. खूप हळहळ वाटतेय. इतकी गोड मुलगी इतक्या छळाला कशी सामोरी गेली असेल ? मी तर ऐकतोय की लग्न मुलीने स्वतः ठरवलं होतं आणि लग्न ठरलं तेव्हा तरी मुलीचं घराणं मुलापेक्षा जास्त तालेवार होतं. ठीक आहे, समजू की मुलीच्या प्रेमापोटी इतका खर्च करून लग्न करून दिलं, पण इतकं करून देखील जर पोरीच्या सासरच्या लोकांची हाव मिटत नसेल, तर फक्त लोक काय म्हणतील आणि आमच्या घराण्याची इज्जत ह्या दोन भ्रामक गोष्टींचा विचार करून माहेरच्या लोकांनी गप्प बसण्यापेक्षा लेकीच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायला हवं होतं.
५० लाखाचे सोने, १० लाखाची चांदी, ४० लाखाची फॉर्च्युनर गाडी आणि ५० लाखाचा लग्नसोहळा इतका पैसा खर्च करून ‘मोठ्या घराण्यातला’ जावई विकत घेण्यापेक्षा एखाद्या साधारण परिस्थितीतल्या पण कष्टाळू, होतकरू मुलाला जावई करून घेऊन ते पैसे लेकीला आणि जावयाला भांडवल म्हणून दिले असते आणि त्यांना एखादा उद्योग सुरु करायला मदत केली असती तर मुलगी तर सुखात राहिली असतीच पण काहीतरी चांगलं, कायमस्वरूपी उभं करता आलं असतं.
मी कॉलेजमध्ये असताना, म्हणजे २००५ - ०६ साली अश्या हुंडाबळीच्या बातम्या खूप यायच्या, पण आता २०२५ मध्ये जेव्हा आपण म्हणतोय की जग इतकं सुधारलंय, मुली शिकत आहेत, करियर करत आहेत, वेगवेगळी क्षेत्रं पादाक्रांत करत आहेत. मुलींचे कपडे बदललेले आपण पाहतोय, त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला आत्मविश्वासपूर्ण वावरही आपण पाहतोय समाजात, मग हे सगळं वरवरचंच आहे का ? इतक्या चांगल्या घरातली, मोठ्या कुटुंबातली, शिकलेली मुलगी तिच्या निवडीने लग्न करते, नंतर तिचा छळ होतो हे आई-वडिलांनाही सांगते, एकदा आत्महत्येचा प्रयत्नही करते, तरीही तिचा ‘संसार वाचावा’ म्हणून आई - वडील तिला परत त्याच घरात पाठवतात. मग शिक्षणाचा, सुबत्तेचा आणि सुसंस्कृतपणाला अर्थ काय उरला ?
मुलीच्या सासरकडचे लोक नालायकच आहेत आणि त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, पण मुलीच्या माहेरच्या लोकांची पण यात चूक नाहीये का ? मुळात सासरच्या लोकांचा पैशांचा लोभ समजल्यावर मुलीच्या आई - वडिलांनी तिला परत पाठवायला नको होती, विशेषतः एकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर. मोठ्या सुनेचाही ह्या लोकांनी छळ केलेला आहे, तिने पोलीस केसही केलेली आहे हेही ह्या लोकांना माहिती होतं तरीही त्यांनी तिला परत सासरी पाठवलं. घराण्याची इभ्रत आणि लोक काय म्हणतील ह्या दोन भ्रामक कल्पनांमुळे त्या बिचाऱ्या निष्पाप पोरीचा बळी गेला. त्यापेक्षा आधीच तिला घरी परत घेऊन येते तर हे सगळं टळलं असतं. लहान बाळ आहे त्या मुलीला असं ऐकलंय. जीव तुटतोय माझा त्या लेकराचा विचार करून, आई नाही, बाप आणि त्याच्या घरचे लोक तुरुंगात. कसल्या परिस्थितीत मोठ होणार ते बाळ ? गरज पडली तर स्वतःच्या पायावर उभं राहता येईल इतका आत्मविश्वास जर देता आला नाही तर मग शिक्षणाचा, ऐश्वर्याचा, माहेरच्या इतक्या मोठ्या कुटुंबाच्या पाठिंब्याचा उपयोग काय?
मुली शिकल्या, आधुनिक झाल्या म्हणजे नेमकं काय बदललं ? फक्त वेशभूषा ? जोडीदाराकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा ? जोडीदाराच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा ? समाज ? काय बदललं नेमकं ? खरंच आता तरी विचार करा!