सुशांत पोवार (संपादकीय) - "याचा आका एसीत बसतो, आकालाच धाडा शिकवायला हवा. एकदा पोलीस बाजूला ठेवा दम असेल तर, एकदा रणांगणात या" हे वक्तव्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांचे. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर शेलक्या भाषेत केलेल्या टीकेच्या निषेधार्थ सोमवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सांगलीमध्ये संस्कृती बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात केले होते. सोमवारी दुपारी सांगली शहरातून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चाच्या समारोप वेळी शरद पवार गटाच्या नेत्यांनी जोरदार भाषण केली. निलेश लंके, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांसारख्या नेत्यांनी पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर टीका केली. यावेळी या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना डायरेक्ट टार्गेट केले. विशेष म्हणजे या मोर्चाला सांगलीचे खासदार विशाल पाटील, विश्वजीत कदम, बापू बिरू वाटेगावकर यांचे पुत्र शिवाजीराव वाटेगावकर यांसारखे अनेक दिग्गज उपस्थित होते.
सांगलीच्या कर्मवीर चौकातून सोमवारी दुपारी एक वाजन्याच्या सुमारास संस्कृती बचाव मोर्चाला सुरुवात झाली. पुष्पराज चौकातून राम मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, रिसाला रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि त्यानंतर कापड पेठ मार्गे स्टेशन चौक असा या मोर्चाचा मार्ग होता. स्टेशन चौकात राजाराम बापू यांच्या पुतळ्यापाशी या मोर्चाचा समारोप करण्यात आला. याच ठिकाणी एका सभेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, उत्तम जाणकर असे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनीही या मोर्चाला हजेरी लावली. बापू बिरू वाटेगावकर यांचे पुत्र शिवाजीराव वाटेगावकर हे सुद्धा या मोर्च्यात सहभागी झाले होते. स्टेशन चौकात मोर्चाचा समारोप झाला. तिथे नेत्यांची भाषणे झाली. खासदार निलेश लंके यांनी याचा आका एसीत बसतो. आकालाच धडा शिकवायला हवा. एकदा पोलीस बाजूला ठेवा. दम असेल तर एकदा रणांगणात या. सरकार मधल्या लोकांकडे विकासाचा अजेंडा नाही. म्हणून असल्या गोष्टी पुढे केल्या जातात. वाचाळवीर आधी दोन पोलीस घेऊन फिरत होते. आता चार पोलीस घेऊन फिरतात. हे कुणाच्या तागदीवर बोलतात हे शोधाव लागेल. सुसंस्कृतपणा राज्यात राहिलेलाच नाही असे म्हणत लंकेंनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तर आमदार रोहित पवार यांनी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणजे बेंटेक्सच सोन आहे. हा विषय तालुका जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र धर्माचा आहे. आम्हीही खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकतो पण आम्ही शब्दांची पातळी जपतो. काही लोक स्वतःला चाणक्य समजतात. या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी निनावी जाहिराती दिल्या. महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण फडणवीस यांनी आणले आहे. बहुजन समाजाच्या नेत्याचा वापर पवार कुटुंबावर, मोठ्या नेत्यावर बोलण्यासाठी केला जातोय पवार कुटुंबाला बोलतात, पाटील कुटुंबाला बोलतात, बहुजन समाजाच्या नेत्यांना कळत नाही की यांचा उपयोग करून घेतला जातोय. या लोकांना बोलून उपयोग नाही यांचा बोलवता धनी कोण त्यांना बोलल पाहिजे अशा शब्दांमध्ये त्यांनी पडळकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. संस्कृती बचाव मोर्च्यात बोलताना जितेंद्र आवाड म्हणाले की राजकारण चुलीत गेले माणुसकी उरली आहे की नाही, आईबद्दल बोलणे ही ठरलेली नीती आहे. जेम्स लेन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईबद्दल लिहिले होते त्यावेळी महाराष्ट्र पेटला तशीच वेळ आज वाटते. वाटोळे करून टाकले महाराष्ट्राचे अशा शब्दात त्यांनी त्यांची भूमिका मांडली. या मोर्चामध्ये बापू वीरू वाटेगावकर यांचे पुत्र शिवाजीराव वाटेगावकर सहभागी झाले होते त्यांनी बोलताना सांगितले की जयंत पाटील यांच्यावर जी टीका झाली तिच्या विरोधात सामान्य माणसांमध्ये एवढा रोष आहे. त्यातल्या त्यात आमच्या धनगर समाजामध्येही मोठ्या प्रमाणात या टीकेच्या विरोधात रोष आहे. तुम्हाला नको त्या ठिकाणी कशाला तोंड खुपसायची सवय लागली आहे. लोकनेते राजाराम बापू यांच्यावर बोलताना तुम्हाला लाज आणि शरम वाटायला हवी होती असे म्हणत एक प्रकारे धनगर समाज जयंत पाटलांच्या पाठीमागे असल्याचा इशाराच पडळकरांना दिला आहे.
आता सांगलीतल्या मोर्च्यात आणखी एक विषय चर्चेचा ठरला तो म्हणजे विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांची उपस्थिती हे दोन्ही नेते या मोर्चाला उपस्थित होते. दोघांनीही भाषण करत पडळकरांवर टीका केली. सांगलीचे खासदार विशाल पाटील बोलताना म्हणाले की मी या ठिकाणी राजाराम बापूंकडे बघून आलो. मी कुसुम ताईंकडे बघून आलो. आज राजाराम बापू जाऊन ४० - ५० वर्षे झाले. वसंत दादा जाऊन ४० वर्षे होत आहेत. अजूनही वैचारिक वाद आहे. तिसरी पिढी आली तरी आम्ही लढतोय आमच्यात संघर्ष आहे आम्ही नाकारणार नाही पण मंचावर बसलेले बहुतेक लोक जयंत पाटील साहेबांच्या प्रेमासाठी आलेत. तुमच्या मनात साहेबांबद्दल जे प्रेम आहे कदाचित ते माझ्या मनात नसेल बापू गेले वाद संपला वैचारिक वाद होता तो संपला कदाचित राजकीय वैचारिक वाद आमचा चालू राहील. आमचा राजकीय शत्रू म्हणून आम्ही जयंत पाटलांकडे बघतो पण आपल्या शत्रू बद्दल सुद्धा आपल्या शत्रूच्या मातेबद्दल सुद्धा असे ऐकून घेण्या एवढे वाईट संस्कार आमच्यावर झाले नाहीत म्हणून पहिला निषेध मी केला असे म्हणत विशाल पाटलांनी जयंत पाटील यांच्यावरच्या टिकेचा निषेध केला तर विश्वजीत कदम यांनी बोलताना सांगली जिल्हा महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जातो. राजकारण हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे. पण या नेत्यांनी विरोधकांवर कधीही वैयक्तिक आणि कौटुंबिक टीका केली नाही पण काही दिवसांपूर्वी भाजपच्या आमदाराने जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला. सगळ्या दिग्गज मंडळींनी सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकमेकांचा आदर सन्मान राखला अलीकडचा काळ दुर्दैवी आहे अशा शब्दात त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला. या सगळ्या राजकीय नेत्यांसोबतच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी सक्षणा सलगर, मेहबूब शेख आणि इतर अनेक नेत्यांची भाषणही यावेळी झाली. सगळ्यांच्या बोलण्याचा सूर हा पडळकरांचा करता धरता म्हणून देवेंद्र फडणवीस हेच असल्याचे दिसून आले.
आता मुख्य मुद्दा म्हणजे संस्कृती बचाव मोर्चाने नेमके काय साध्य केले तर या मोर्च्यातून साध्य झालेली पहिली गोष्ट म्हणजे जिल्ह्याचे गट तट एकत्र आले. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेत विशाल पाटलांना तिकीट देखील मिळाले नव्हते. अंतर्गत राजकारणातून विशाल पाटील यांचे तिकीट कट करण्यात आले आणि त्यामागे जयंत पाटील असल्याचे बोलले जात होते. वास्तविक या राजकारणाला दादा बापू संघर्षाची किनार असल्याची देखील चर्चा होत्या. जिल्ह्याच्या राजकारणात वसंत दादा पाटलांचा एक गट आणि राजाराम बापू पाटलांचा एक गट अस चित्र होते. या राजकारणातूनच पुढचे राजकारण आकाराला येत गेले. अर्थात निमित्त मात्र एकत्र येत असले तरी या दादा आणि बापूंची पुढची पिढी एकमेकांच्या यांच्या विरोधातच राजकारण करताना दिसली. २०१४ सालच्या प्रतीक पाटलांच्या पराभावानंतर तर दादा घराण्याच राजकारण संपुष्टातच आले होते. एका बाजूला विशाल पाटील आणि विश्वजीत कदम आणि दुसऱ्या बाजूला जयंत पाटील असे चित्र आजवर राहिले, पण आजच्या या सभेतून विश्वजीत आणि विशाल पाटलांनी जयंत पाटलांसाठी मैदान मारले. अर्थात तीन मातब्बर घराणी पडळकरांच्या विरोधात एकत्र आली पण पडळकरांच्या विरोधात एकत्र येण्यापेक्षा ही घराणी एकमेकांसाठी धावून आल्याची अधिक चर्चा होती. आता आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेत हेच गणित जुळून आले तर मात्र विशाल पाटील, विश्वजीत कदम व जयंत पाटलांचे मनापासून एक होणे महायुतीसाठी विशेष करून भाजपसाठी डोकेदुखीचा विषय ठरू शकतो. संस्कृती बचाव मोर्चाने साध्य गेलेली दुसरी गोष्ट म्हणजे मराठा विरुद्ध धनगर या पडळकरांच्या खेळीला टॅक केले. वास्तविक सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मराठा घराणी प्रस्तावित घराणे म्हणून ओळखली जातात. पडळकरांनी या सर्वच घराण्यांना कधी ना कधी टार्गेट केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचे तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले. पतंगराव कदम, आर.आर.पाटील, जयंत पाटील अशा नेत्यांना पडळकरांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत कधी ना कधी टार्गेट केलेलेच आहे. पर्यायाने प्रस्तावित मराठा घराणी विरुद्ध विस्थापित समाजाचा नेता असे स्वरूप पडळकरांच्या राजकारणाला मिळत गेले ज्याचा फायदा पडळकरांनी घेतला. आजच्या या सभेतून मात्र उत्तमराव जाणकर, सक्षना सलगर अशा धनगर नेत्यांनी पडळकरांविरोधात जातीय भूमिका घेण्यावरून मोर्चा चढवला. फडणविसांनी धनगर आरक्षणाचा शब्द दिला होता त्याचे काय झाले. धनगर समाजाच नाव घेऊन राजकारण करता तर आपल्याच भावाला आपल्याच घरात सगळी पदक का देता असे प्रश्न पडळकरांना विचारण्यात आले. अर्थात जो जातीय राजकारणाचा एक अँँगल पडळकरांकडून या संघर्षाला देण्यात येतो तो डायवर्ट करण्याचा प्रयत्न देखील या सभेतून करण्यात आला.
संस्कृती बचाव मोर्चाने साध्य केलेली तिसरी गोष्ट म्हणजे फडणवीस टारगेट जरी पडळकरांनी शेलक्या शब्दात टीका केली असेल आणि जरीही फडणविसांनी त्यांना माफी मागायला लावली असेल तरी फडणवीसच या सर्वांच्या मागे आहेत हे नरेटिव्ह आजच्या या सभेतून पुढे आणण्यात आले. शरद पवार गट म्हणून राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याने आपल्या भाषणात यामागे फडणविसांचाच कसा हात आहे याची मांडणी केली. काहींनी फडणविसांचा उल्लेख आका असाही केला. देवेंद्र फडणवीस स्वतःहून अडचणीत येत असले तरीही प्रसाद लाड, चित्रावाघ, गोपीचंद पडळकर, नितेश राणे अशा नेत्यांच्या सातत्याने होणाऱ्या वादग्रस्त विधानांमागे फडणविसांचाच हातबार असल्याची टीका या सभेतून झाली. अर्थात हा दाखला देताना महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि भाजपच्याच नेत्यांची उदाहरण देण्यात आली. भाजप मधून देखील पडळकरांच्या टिकेवरून मतमतांतरे असल्याचे सांगण्यात येते. पण महत्त्वाचा मुद्दा आपण ज्या नेत्यांची वादग्रस्त टिकेमुळे चर्चेत येतात म्हणून नाव घेतली ती सर्व टीम फडणवीस म्हणून ओळखली जातात. विशेष म्हणजे यातला एकही नेता मूळ भाजपची पार्श्वभूमी असणारा संघाची पार्श्वभूमी असणारा नाहीये. इतर पक्षातून सत्तेतला लाभ घेण्यासाठी फडणविसांच्या जवळ गेलेले नेते म्हणून विरोधक त्यांचा उल्लेख करत असतात. पडळकरांनी टीका केली असली तरी ती फडणविसांनीच करायला लावली असे सर्वच नेत्यांनी बोलून एक प्रकारे हा विषय राज्य पातळीवरचा कसा होईल हे देखील हेरले. अर्थात शेलकी टीका करून पडळकर अडचणीत आल्यासे सध्या तरी बोलले जात आहे. त्यांच्या विरोधात सर्वच विरोधक एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी काळात पडळकर शांत होतात की अजून त्वेषाने टीका करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.