सुशांत पोवार (कोल्हापूर) - राज्यात बनावट औषधांचा भांडाफोड करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तब्बल ११ जिल्ह्यांमध्ये बनावट औषध विक्री होत असल्याचा धक्कादायक अहवाल एफडीएनं मध्यंतरी सादर केला होता. काही दिवसांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाने बनावट औषध रॅकेट प्रकरणी मोठी कारवाई पुण्यात केली होती. आता या कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली आणि चंदीगड येथून बनावट औषधांचं रॅकेट संपूर्ण राज्यभर चालवलं जात असल्याची माहिती समोर आलीय. पुणे, मुंबई आणि रायगडम भागातून हे रॅकेट ॲापरेट केले जात होतं. या रॅकेटचे धागेदोरे आता कोल्हापूर पर्यंत पोहचले असून वेळीच अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली नाही तर हे रॅकेट आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे शहर पोलिस यांच्या संयुक्त कारवाईमध्ये एका मोठ्या बनावट औषध रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पुणे, मुंबई आणि रायगडमध्ये मिळून सुमारे ४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतींची बनावट अल्ब्युरेल (ह्यमन नॉर्मल अल्ब्युमिन आयपी) इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. अनेक छाप्यांमध्ये दिल्ली आणि चंदीगडशी संबंधित पुरवठादारांना अटक करण्यात आली. एफडीएच्या औषध निरीक्षक श्रुतिका जाधव आणि विजय नांगरे यांनी पुण्यातील गंगाधाम चौकातील श्रीराम हेल्थकेअरमध्ये केलेल्या तपासणीत अधिकाऱ्यांना संशयास्पद साठा आढळल्यानंतर अल्ब्युरेल नावाच्या औषधाचे नमुने घेण्यात आले. तपासणीदरम्यान उपस्थित असलेले रिलायन्स लाईफ सायन्सेस, नाशिकचे जनरल मॅनेजर (क्वालिटी अॅश्युरन्स) सौरभ नाईक यांनी औषधे बनावट असल्याची शंका व्यक्त केली.
१३ आणि १५ सप्टेंबर रोजी औषध निरीक्षक प्रकाश कोळी आणि राहुल कारंडे यांनी कामोठे येथील आर.आर.टी. फार्मावर छापा टाकला. यावेळी फार्माचे मालक रितेश ठोंबरे खरेदी-विक्री रेकॉर्डविषयी पुरेशी माहिती देऊ शकले नाहीत. पोलिसांच्या मदतीने त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली असता कोणताही साठा आढळला नाही. ठोंबरे यांनी दिल्लीतील दानिश खान यांच्याकडून ऑनलाइन पैसे देऊन बिल न घेता औषधे खरेदी केल्याचे तपासणीअंती कबूल केले. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दानिश खान यास ताब्यात घेतले. यावेळी खान याने ग्लास्को फार्मास्युटिकल आणि युनिटल फार्मास्युटिकलचे मालक चंदीगड राजकुमार मिश्रा यांच्याकडून बनावट अल्ब्युरेल इंजेक्शन मिळविल्याचे कबूल केले. हे सर्व व्यवहार दिल्लीतील भगीरथ पॅलेस मार्केटमधून रोख रकमेत व बिलांशिवाय करण्यात आले असल्याची माहिती खान याने दिली आहे.
दरम्यान, औषध निरीक्षक हेमंत आडे यांनी १४ सप्टेंबर रोजी सायनमधील एन.आर.ए.एक्स. फार्मावर छापा टाकत सुमारे १.२६ लाख रुपयांच्या अल्ब्युरेल इंजेक्शनच्या १७ बाटल्या जप्त केल्या आहेत. या घडामोडींनंतर, एफडीए निरीक्षक जाधव, नांगरे आणि विवेक खेडकर यांनी श्रीराम नंदकिशोर चांडक (मालक, श्रीराम हेल्थकेअर), राजेश शांताराम जोग आणि शैलम गटला (भागीदार, आर. एसएल. फार्मा, सदाशिव पेठ), रितेश रोहिदास ठोंबरे (मालक, आर.आर.टी. फार्मा, कामोठे), मोहम्मद दानिश खान (दिल्ली रहिवासी) यांच्याविरुद्ध पुण्यातील मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. या प्रकरणी गुरुवार ता. १६ सप्टेंबरला गुन्हा क्रमांक ०१८२/२०२५, आयपीसी २०२३ कलम ३१८ (४), ३३६ (३), ३४० (२), २७८, ६० आणि ३(५), गुन्हे क्रमांक ०१८२/२०२५ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. त्याच दिवशी पोलिसांनी ठोंबरे आणि खान यांना ताब्यात घेतले असून त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. पुणे पोलिस सह आयुक्त गिरीश हुकरे, व्ही.टी.जाधव (सह आयुक्त, कोकण विभाग), पोंगाळे आणि ठाकरे (सह आयुक्त, पुणे) आणि गवळी (सह आयुक्त, रायगड) यांच्या देखरेखीखाली एफडीए निरीक्षक श्रुतिका जाधव, विजय नांगरे, विवेक खेडकर, प्रकाश कोळी, राहुल कारंडे आणि हेमंत आडे यांनी बहु-शहरीय तपास करत ही संपूर्ण कारवाई केली आहे. पुढील काळात बनावट औषधांच्या व्यापारात सहभागी असलेल्या व्यापक नेटवर्कचा शोध घेऊन योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
पुण्यातील कारवाई नंतर सदरचे बनावट अल्ब्युरेल (ह्यमन नॉर्मल अल्ब्युमिन आयपी) इंजेक्शन कोल्हापुरातील कोविड काळात झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने सुरु केलेला औषध पुरवठादार अमराठी व्यावसायिकाने याचा साठा करून कोल्हापुरातील नामांकित रुग्णालयांना पुरविल्याचा संशय निर्भीड पोलीस टाइम्सने राजेश नार्वेकर,आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांना पत्रव्यवहार केला असून अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल खाडे यांना फोनद्वारे माहिती दिली असून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश कोल्हापूर कार्यालय येथे देण्याचे आश्वासन दिले आहे.