सुशांत पोवार (संपादकीय) - जयंत पाटील महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकली असती तर होणारे संभाव्य मुख्यमंत्री, पण ते आले फक्त 13 हजार मतांनी. दुसरीकडे बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री, कित्येक वर्ष आमदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले नेते आणि ते देखील २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत आली असती तर होणारे संभाव्य मुख्यमंत्री. पण या महाविकास आघाडीला चकवा बसला तसाच या दोन नेत्यांना बसला. थोरात कधी नव्हे ते पराभूत झाले. थोरात पडणं ही अशक्य गोष्ट वाटत होती पण अमोल खताळ या तरुणाने विखेंच्या रजदीवर हे काम फत्ते केलं. दुसरीकडे जयंत पाटील पाटलांच लीड 50 हजारांच्या आत येणं अशक्य होतं पण ते आलं. पडतात पडतात असं वाटू लागलं पण शेवटी 13 हजार म्हणजे पाटलांच्या दृष्टीने काठावरच ते जिंकले. आता या दोन नेत्यांबाबत आपण सध्या संपादकीय लिहितोय का तर या दोन नेत्यांचा कॉमन फॅक्टर म्हणजे हे महाराष्ट्राच्या राजकारणात बराच काळ केंद्रबिंदूवर राहिलेले नेते पण एका निकालाने या दोन्ही नेत्यांचे महत्त्व संपुष्टात आलं. मतदारसंघात देखील यांच्या नेतृत्वाबाबत संशय निर्माण झाला. लोकांचा कालपर्यंतचा राबता कमी होऊ लागला पण त्यांच्या मागे पुन्हा जनाधार निर्माण करण्याचं, त्यांच्या मागे पुन्हा सहानुभूतीच वारं निर्माण करण्याचं खरं काम केलं ते खताळ आणि पडळकरांनी. खताळ आणि पडळकरांनी नेमकं काय केलं ? त्यांच्या राजकीय असमंजसपणामुळे कशाप्रकारे या दोन नेत्यांनी आपलं काम साध्य केलं ? आणि भाजपचं वारं या दोन्ही नेत्यांनी कसं गुमराँंग केलं ? याकडे संपादकीयच्या माध्यमातून वाचकांसमोर आज देतोय..
एक तर जयंत पाटील काठावर आले त्यानंतर जयंत पाटील भाजपमध्ये जातील अशा चर्चा झाल्या पण ते काही घडून आलं नाही प्रदेशाध्यक्ष पदावरूनही त्यांना दूर व्हावं लागलं. पक्षाचे फक्त 10 आमदारच असल्याने त्यांच राजकीय महत्त्व देखील पूर्वी इतक राहिलं नाही त्यात पक्षांतर्गत सुप्त स्पर्धेमुळे जयंत पाटलांच्या मागे नेमके किती आमदार आहेत हे सांगणं पण अशक्य होत गेलं. थोडक्यात काल पर्यंत जयंत जयंत पाटलांच राज्याच्या राजकारणात जे महत्त्व होतं ते जवळपास संपुष्टात आलं. मतदारसंघात देखील जयंत पाटील हे कधीच काठावर येऊ शकत नाहीत अशी चर्चा होती पण निशिकांत पाटलांनी त्यांना काठावर आणलं आणि जयंत पाटलांच्या हातून गावकी भावकी निष्पत असल्याची चर्चा झाली. जिल्ह्याच्या राजकारणात देखील पाटील बॅकफूटवर गेलेत अशा चर्चा सुरू झाल्या. ना राज्यात ना जिल्ह्यात ना मतदारसंघात जुना रुबाब अशा फॅक्टरवर जयंत पाटलांच राजकारण येत होतं पण याला ब्रेक लावला तो पडळकरांनी. पडळकरांनी जयंत पाटलांना धारेवर धरलं होतंच आजपर्यंत ते शेलक्या भाषेत टीका करतच होते पण सहानुभूतीचा फॅक्टर जयंत पाटलांच्या मागे उभा राहत नव्हता. दोन दिवसांपूर्वी मात्र पडळकरांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट राजाराम बापूंवर टीका केली. आता ही टीका नदीपट्ट्याच्या राजकारणाच्या जिवाळाचा विषय. जिल्ह्यात एकेकाळी वसंत दादा आणि राजाराम बापू असे दोन गट होते. बापूंना मानणारा देखील मोठा वर्ग त्यात अशा प्रकारची टीका साहजिकच रिएक्शन आली ती जोरदार आली आता या टिकेनंतर काय घडलं ते विस्ताराने बोलू...
पडळकरांच्या वक्तव्यावर ठीक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. त्यातल्या एका मोर्च्यात पडळकरांना हा आमच्यातला नाहीच असं म्हणणारे एक व्यक्ती होते ते बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव बापू बिरू. यांना धनगर समाजात मोठं स्थान, पडळकरांनी धनगर समाजाच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात स्वतःकडे आकर्षित केलं पण नदी काठावरच राजकारण वेगळं इथे धनगर मराठा असा मोठा भेद नाही. जयंत पाटलांच्या बाजूने असे धनगर समाजाचे नेते आल्यान पडळकर जातीच्या फॅक्टरवर मराठा धनगर असा संघर्ष घेऊन जाण्याचा जो प्रयत्न करत होते त्यालाही ब्रेक लागला. दुसरीकडे शाखा अभियंता हा वडार समाजातून येणारा, पर्यायाने अल्पसंख्येत असणाऱ्या समाजाच्या मागे जयंत पाटील उभे आहेत असे चित्रही यामुळे उभं राहिलं. अल्पजातीची मोट बांधण्याचा जो प्रयोग भाजप करत होती. जो प्रयोग पडळकर करू पाहत होते त्याला ब्रेक लागला. आता पडळकरांच्या या कृतीमुळे प्रशासनाला देखील जायचा तो मेसेज गेला म्हणजे जयंत पाटलांचा प्रभाव आता राहिला नाही हे पडळकर सातत्याने सांगू पाहत होते पण घडलं काय तर पडळकरांच्या आरोपांमुळे आजही जयंत पाटलांच्या हाती सूत्र आहेत असं चित्र तयार झालं. आता यातली खरी गोष्ट सांगायची तर वर्षानुवर्ष जयंत पाटील सत्तेत आहेत यांच्या हाताखाली प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काम केल आहे. या ३० - ३५ वर्षात अनेक अधिकाऱ्यांची मदत केलेली असते असे संबंध तयार झालेले असतात. फक्त सत्ता अनुषयी आली म्हणून हे अधिकारी एका दिवसात पडळकरांकडे किंवा सत्तेकडे जातील असं नसतं. असं वरतून या अधिकाऱ्यांनी दाखवलं तरी आतून जयंत पाटलांना दुखवू नये असाच यांचा होरा असतो आणि तो स्वाभाविक आहे. पण पडळकरांच्या आतताईपणामुळे हे चित्र उघड झालं. यामुळे नेमकं काय होतं तर आजही आमच्याच माणसांच चालतं हे चित्र सर्वसामान्य मतदारांना पुन्हा जयंत पाटलांकडे आकर्षित करताना दिसतं. थोडक्यात एका टिकेमुळे शांत असलेल्या जयंत पाटलांना सहानुभूतीचा फॅक्टर मिळाला. जो परंपरागत सत्ता असणाऱ्या नेत्याला मिळणं अवघड असतं. दुसरी गोष्ट इतर जातीची मूठ आणि तालुक्यातल्या धनगर समाजाचा पाठिंबा आपोआप जयंत पाटलांकडे जाऊ लागला आणि जयंत पाटलांच राजकारण ऍक्टिव्ह झालं.
बाळासाहेब थोरात तर पराभूत झाले. या पराभवामुळे अमोल खताळांच मोठं कौतुक झालं. कसे एका नवख्या उमेदवाराने थोरातां सारख्या उमेदवाराचा पराभव केला. सुजय विकेंचा जोर असला तरी थोरातांना पाडणं सोपी गोष्ट नव्हती. जायंट किलर म्हणून खताळ्यांना मोठा चान्स होता पण गावातली भांडणं आणि खोटे नाटे आरोप थोरातांना बळ देऊन गेले. झालं असं की काही दिवसांपूर्वी संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनात दंगा झाला. थोरातांचे कार्यकर्ते महाराजांच्या अंगावर धावून गेले त्यांची गाडी फोडली असा आरोप झाला. पण हीच ती संधी थोरातांनी साधली बाळासाहेब थोरात्यांनी संगमनेरच्या चौकातच सभा बोलवली आता या सभेला हजारोंची गर्दी झाली आणि बाळासाहेब थोरातांचे वर्चस्व आजही अबाधित आहे हे चित्र निर्माण झालं. त्यानंतर या सभेतून जे झालं त्यामुळे थोरातांच्या राजकारणाने पुन्हा उसळी घेतली. नेमकं काय तर कीर्तनकारांना मारहाण हा फॅक्टर हिंदुत्वाला विरोध म्हणून रंगवण्यात आला पण थोरातांनी पुरावे दाखवले तेव्हा महाराज राजकारणावर ज्ञान देताना दिसले. गादी सोडून आमदारांच्या पाया पडताना दिसले. अगोदरच फुटलेली गाडी समोर करून मारहाण झाल्याचा कांगावा करताना दिसले. हिंदुत्वाच नाव घेऊन फक्त राजकारण कसं चालू आहे असं सांगत बाळासाहेबांनी मुस्लिम धारजण राजकारण म्हणून आपल्यावर होत असलेल्या टिकेचा समाचार घेतला. अर्थात या उसळीला देखील खताळ कारणीभूत ठरले. वास्तविक गाव पातळीवर हा प्रकार तिथेच मिटलेला असताना त्याला खताळ्यांच्या पाठिंब्याने बळ देण्यात आल्याची टीका झाली. अगदी अलगद आलेला डाव थोरातांनी पकडला. आमदार कोणी असो ते तालुक्याच्या राजकारणात पुन्हा क्रमांक एक वर जाऊन बसले. राज्यात पुन्हा बाळासाहेब थोरात बातम्यांमध्ये झळकू लागले अर्थात निखार विजत असताना फुंकर घालायला जाऊ नये हे शहाणपण पडळकर असोत वा खताळ यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे या दोन्ही नेत्यांच्या मागे सहानुभूतीचा फॅक्टर उभा राहिला. आता अशीच अपरिपक्वता पहिल्या टर्मचे किती आमदार दाखवतात आणि येणाऱ्या काळात भाजपच्या कार्यक्रमावर पाणी टाकतात हे देखील दिसून येईल.