सुशांत पोवार (संपादकीय) - गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातल नांदणी गाव आणि या गावातली महादेवी उर्फ माधुरी हत्तीण याची अखख्या महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावच्या स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान या जैन मठात महादेवी हत्तीसह गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्य होतं, पण पेटा संस्थेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर महादेवी हत्तीची रवानगी गुजरातमधील वनतारा प्राणी कल्याण केंद्रात करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. पुढं सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल कायम ठेवण्यात आल्याने महादेवीची रवानगी वनतारामध्ये करण्यात आली. त्यावेळी महादेवीसाठी अखख नांदणी गाव भाऊक झाल्याच दिसून आलं, मग वनताराचे मालक अंबानींंच्या जिओवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही घेण्यात आला. फक्त नांदणी गावच नाही तर अख्या कोल्हापुरातून महादेवी हत्तीणीसाठी लोकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. लोकप्रतिनिधी यामध्ये लक्ष घालत नसल्याची खंतही गावकऱ्यांनी व्यक्त केली आणि मग कोल्हापूरच राजकारण महादेवीभोवती फिरायला सुरुवात झाली. विरोधकांसह सत्ताधारी आमदार खासदारांनी महादेवीला नांदणीत परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही पुढाऱ्यांनी सह्यांची मोहीम हाती घेऊन हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्न केले. याचाच पुढचा भाग म्हणून सत्ताधारी आमदार खासदारांच्या प्रयत्नातून काल शुक्रवार १ ऑगस्टला वनताराचे सीईओ आणि त्यांची टीम कोल्हापुरात आली. जैन मठाच्या मठाधिपतींसोबत त्यांची बैठक झाली या बैठकीत नक्की काय झालं ? वनताराच्या सीईओ म्हणणं काय ? आणि महादेवी नांदणीत परत येणार का ? त्याच्यावर आज संपादकीय मधून प्रकाशझोत टाकला आहे....
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर २८ जुलैला महादेवी हत्तीणीची वनतारा इथे पाठवणी करण्यात आली. यावेळी जैन मठाच्या मठाधिपतींसह अक्ख नांदणी गाव रडत होतं. इतकच नाही तर महादेवी हत्तीच्या डोळ्यांतून सुद्धा अश्रू वाहत असल्याचं पाहायला मिळालं. हे सगळं दृश्य अंगावर काटा आणणार होतं मग गावकऱ्यांनी आपल्या महादेवीला परत आणण्यासाठी एक आगळी वेगळी मोहीम सुरू केली. महादेवीला ज्या वनतारामध्ये पाठवण्यात आलं त्या वनताराचे मालक अंबानींंच्या जिओवर बहिष्कार टाकायला गावकऱ्यांनी सुरुवात केली. आमच्या महादेवीला तुमचे मालक घेऊन गेल्यामुळे आम्हाला तुमचं सिम कार्ड नको असं जिओच्या कस्टमर केअरवाल्यांना गावकऱ्यांनी ठणकावून सांगितलं. त्याच्या ऑडिओ क्लिप्सही व्हायरल झाल्या. गावातल्या जवळपास ७ हजार लोकांनी जिओचे सिम कार्ड एअरटेल ला पोट केल्याच्या बातम्याही आल्या. यामध्ये माजी खासदार राजू शेट्टींनी आपलं जिओ कार्ड पोट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आमचा हत्ती कायद्याला वाटेल तसा वाकवून आमच्या भावनांचा विचार न करता सत्तेचा वापर करून आमच्या हत्तीला नेण्यात आलं. पैशांच्या जीवावर रिलायन्स इंडस्ट्री दादागिरी करते त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच कार्ड बदलण्याचा सामूहिक निर्णय घेतल्याचं राजू शेट्टींनी जिओच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. तसच महादेवीची वनतारामध्ये रवाणगी झाल्यानंतर हा निर्णय म्हणजे एका बड्या उद्योगपतीच्या बालहट्टासाठी समाजाच्या भावनांवर कुरघोडी असल्याची प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली. त्यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांकडून विराट मूक मोर्चाही काढण्यात आला होता. तर येत्या रविवारी नांदणी पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राजू शेट्टी आत्मक्लेश पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर कोल्हापुरातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनीही याबाबत भूमिका घेतली. ३० जुलैला सतेज पाटील यांच्याकडून महादेवीला परत आणण्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली. एक स्वाक्षरी महादेवीला आपल्या घरी आणण्यासाठी या नावाने ही मोहीम सुरू करण्यात आली. सतेज पाटील यांनी गुरुवार ३१ जुलैला नांदडी इथल्या मठाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत कोर्टात केस सुरू होती. पण आता हे वेगळ्या पद्धतीन काहीतरी षडयंत्र सुरू असल्याचं मला वाटायला लागलंय. पेटानं एचपीसीकडे अर्ज केला आणि त्या अर्जातच सांगितलं की हा हत्ती गुजरातला हलवला पाहिजे. इथूनच शंकेला सुरुवात होते. २१ जुलैला पहिल्यांदा नांदणीचे शिष्टमंडळ सतेज पाटील यांच्याकडे आलं त्याचवेळी सतेज पाटीलांनी भूमिका घेतली होती. त्यांची भूमिका ही समाज, हत्ती आणि मठाच्या बाजूने आहे. त्यासाठी सतेज पाटीलांनी आता सह्यांची मोहीम हाती घेतली आहे त्याला लाखो लोकांनी देशभरातून प्रतिसाद दिलाय. त्यामुळे या सह्यांच्या माध्यमातून सतेज पाटील राष्ट्रपतींना निवेदन देणार आहोत आणि आम्हाला आमचा हत्ती परत द्यावा अशी मागणी करणार असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. गुरुवारी रात्री सतेज पाटील यांनी ट्वीट करत महादेवी हत्तिणीला परत आणण्यासाठी २४ तासात १ लाख 25 हजार 353 लोकांनी सह्या केल्याचं सांगितलं शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत ही सह्यांची मोहीम सुरू राहणार आहे. नांदणी मठाचे स्वामीजी यांच्या हस्ते या सह्यांच्या सर्व फॉर्मचे शनिवारी सकाळी १० वाजता नांदणीत पूजन होईल. शनिवार दोन ऑगस्टच्या दुपारी एक वाजता कोल्हापुरातील रमणमाळा पोस्ट ऑफिस मधून स्पीड पोस्ट द्वारे हे सर्व फॉर्म राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवण्यात येतील असं सतेज पाटील यांनी जाहीर केलं.
एकीकडे या सगळ्या गोष्टी होत असतानाच सत्ताधारी खासदारांकडूनही महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनी महादेवी हत्तीळीला परत आणण्यासाठी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना एक निवेदन सादर केलं. महादेवीला परत आणण्यासाठी आपण सगळे सगळे प्रयत्न करणार असल्याचं महाडिकांनी म्हटलं. यावेळी कायदेशीर पर्याय तपासून शक्य ते सगळे प्रयत्न करू असं आश्वासन त्यांना केंद्रीय वनमंत्र्यांकडून देण्यात आलं तर धनंजय महाडीक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडीक यांनीही याबाबत भूमिका मांडली. त्यांनी जैन मठाला भेट देऊन मठाधिपतींशी संवाद साधला तसेच माधुरी हत्तीच्या आठवणी अजूनही जिवंत आहेत. माधुरीचे मठाशी नातं केवळ प्राण्यापुरत मर्यादित नसून ती श्रद्धा आणि माणुसकीच प्रतीक होती तिला परत आणण्यासाठी सगळ्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की ती परत येणारच आहे असं कृष्णराज महाडीक यांनी सांगितलं. यासोबतच शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही नांदणी मठाला भेट दिली. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारने या मठाच्या बाजूने हत्ती इथं राहावा यासाठी स्पष्टपणे भूमिका घेणं गरजेच आहे अशी प्रतिक्रिया दिली. सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असती तर हा प्रसंग टळला असता. सुप्रीम कोर्टाकडून सकारात्मक निकाल मिळाला नसेल तरी राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप केला तर न्याय मिळू शकेल अशी आमची अपेक्षा आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान या सगळ्यात हातकणंगलेचे एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची दिल्लीत भेट घेत याबद्दल माहिती दिली. तसच जैन समाजाच्या शिष्ठ मंडळाने कोल्हापूर दौऱ्यातही श्रीकांत शिंदेना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर थेट वनताराच्या अनंत अंबानींंशी संपर्क साधत श्रीकांत शिंदेनी या सगळ्याची पार्श्वभूमी सांगितली. त्यानंतर वनताराचे सीईओ आणि मी स्वतः नांदणी मठाला भेट देणार असल्याचं धैर्यशील मानेनी सोशल मीडिया द्वारे सांगितलं. त्यानंतर काल शुक्रवारी दुपारी वनताराचे सीईओ विहान करणी आणि त्यांच्या टीमसह खासदार धैर्यशील माने आणि धनंजय महाडीक हे कोल्हापुरात दाखल झाले. कोल्हापूर विमानतळावर असताना तिथे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याशी त्यांनी चर्चा केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याने त्यांनी नांदणीत जाऊ नये अशी विनंती त्यांना पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली. त्यामुळे नांदणीच्या मठाचे मठाधिपती जिलसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींना कोल्हापुरात बोलावण्यात आलं. त्यानंतर मठाधिपती आणि वनताराचे सीईओ विहान करणी यांच्यात दुपारपर्यंत चर्चा झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. नांदणी मठाचे महाराज आणि वनताराचे सीईओ यांच्यात झालेल्या बैठकीत मठाची हत्ती वनतारात नेण्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नाही. जे काही झालंय ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाल्याचं वनताराच्या सीईओनी म्हटलं. त्यामुळं जर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आले तर वनतारा कडून माधुरी हत्तीण परत देण्यात येईल. नांदणी मठानं सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात. वनतारा त्यासाठी सर्व ते सहकार्य करेल. हव असल्यास नांदणीच्या मठामध्ये वनताराचे एक युनिट सुरू करू अशी भूमिका वनताराच्या सीओनी बैठकीत मांडली. दरम्यान या बैठकीनंतर मठाधिपती तिथून नाराज होऊन बाहेर पडल्याच्या चर्चा झाल्या. प्रसार माध्यमांशी कोणताही संवाद न साधता मठाधिपती तिथून निघून गेले तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर "माधुरी हमारी जान है" अशी घोषणाबाजी गावकऱ्यांकडून करण्यात आली होती.
या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. महादेवी हत्तीणीला वनतारात नेल्यावर कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी केंद्रीय वनमंत्र्यांबरोबर संपर्क केला. त्याचबरोबर वनताराच्या सर्व संबंधित सीईओ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली. त्यानंतर नांदणीचे मठाधिपती आणि वनताराचे सीईओ यांची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या तासभराच्या चर्चेत दोन्ही बाजूने आपल्या आपल्या पद्धतीने भूमिका स्पष्ट करण्यात आल्या. आपल्या सगळ्या कोल्हापूरकरांच्या भावना वनताराला दोन्ही खासदारांनी सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकच आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं आपल्याकडची महादेवी हत्ती त्यांच्याकडे सुपूर्त झाली. याच्यापेक्षा त्याच्यातला त्यांचा रोल शून्य आहे. वनताराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टातल्या ज्या काही लीगल प्रोसेस असतील त्या लीगल प्रोसेस करा. त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वनतरातल्या सगळ्या यंत्रणेची आहे. आता भाग दुसरा आहे की या सगळ्यात आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे की कोणत्याही परिस्थितीत आपली महादेवी हत्तीण परत यायला पाहिजे. सगळ्या जनमाणसांची भावना लक्षात घेऊन शासनाच्या माध्यमातून आम्ही सगळे सुप्रीम कोर्टात ताकदीने प्रयत्न करतोय पण जेव्हा एखाद्या गोष्टीत सुप्रीम कोर्ट निर्णय घेते तेव्हा फक्त जनभावना महत्त्वाची नसते जनभावने इतकीच लीगल प्रोसेसही महत्त्वाची आहे. लीगल प्रोसेस करणही गरजेचं आहे असं आबिटकरांनी स्पष्ट केलं. एकंदरीतच आता महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी गल्लीपासून दिल्ली पर्यंत वेगाने सूत्र हलल्याचे पाहायला मिळतय पण यासोबतच स्थानिकांमध्ये लोकप्रतिनिधींबाबत नाराजीचा सूर असल्याची चर्चाही आहे. महादेवी हत्तीणी बाबत कोल्हापुरातल्या पुढाऱ्यांनी सुरुवातीपासून ठाम भूमिका न घेतल्याचं गावकऱ्यांच म्हणणं आहे. याबाबत राजू शेट्टी सोडले तर स्थानिक नेते, आमदार, खासदार आणि राज्य सरकारने सुरुवातीला मौन व्रत पाळल्याचे आरोप झाले. पण आता हा मुद्दा फक्त हत्तीणीपुरता मर्यादित राहिला नसून तो लोकभावनेचा विषय झाल्यानं यावरून राजकीय डाव साधण्यासाठी पुढाऱ्यांनी हालचाली सुरू केल्याची टीका ही केली जाते. आता महादेवीला परत आणण्यात कायदेशीर अडथळा मोठा आहे. कारण हा निकाल सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलाय. आता राष्ट्रपतींना यात हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात येत असल्यामुळे याबाबत वेगळा निर्णय होण्याची आणि महादेवी परत येण्याची आशा व्यक्त केली जाते.