सुशांत पोवार (विशेष वृत्त) - महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या भागम भाग पाहायला मिळतो आहे. कोणी दिल्लीवारी करतय तर कोणी राजभवनाच्या धावा करत आहेत. कोणी मुख्यमंत्र्यांना भेटून तेवढं आपलं मंत्रिपदाच बघा बुवा म्हणून सांगतय तर कोणी गुपचूप अंधाऱ्या रात्री भेटीगाठी घेतय. राज्यात तीन पक्षांच सरकार असल्यानं कोण कुठे ताणतय हे समजेना झालं. राज्यात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू आहेत. एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाऊन आलेत, दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. या दोन्ही घडामोडींच्या टाइमिंग वरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आल हे कमी की काय म्हणून आता शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप मध्ये विलीन होणार असल्याची नवीन ट्यून निघाली आहे. हे सर्व प्रकार पाहता महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असं नक्कीच नाही.
राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेत नेत्यांच्या धावपळीवरून दिसून येतायत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी दिल्लीचा दौरा केल्यान चर्चांना उधान आलय. या दौऱ्यात त्यांनी आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांसोबत बैठक घेतल्याचं सांगण्यात येत. याशिवाय अधिवेशनात मांडावयाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचेही एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलंय. शिंदेच्या या अनपेक्षित दिल्ली भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधान आल आहे. दुसरीकडे त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. या भेटीत फडणवीस यांनी राज्यपालांसोबत विविध विषयांवर चर्चा केली असल्याची माहिती मिळते. परंतु या भेटीमागे काही ठोस कारण नसताना फडणवीस यांनी ही भेट नेमकी का घेतली असावी ? असाही प्रश्न आता विचारला जातोय. राज्याच्या मंत्रिमंडळात काही फेरबदल करण्यात येणार असल्याच्या चर्चा जोरात येत आहेत. काही वादग्रस्त नेत्यांना बदलून त्यांच्या जागी नवीन चेहरे समोर आणले जाणार असल्याचंही बोललं जातय. याच नवीन बदलांची माहिती देण्यासाठी फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली असावी अशी चर्चा जोरात सुरू आहे. परंतु साधारणतः महायुतीत कुठलेही बदल करण्याआधी तीनही मित्रपक्षांनी सोबत बसून चर्चा करून मग निर्णय घेणे अपेक्षित आहे. तीनही पक्षांचे एकमत झाल्यानंतर मग राज्यपालांची वेळ घेऊन मंत्रिमंडळ विस्तार असो की काही फेरबदल असो ते केले जात असतात. परंतु फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेण्याआधी दोन्ही मित्र पक्षांची चर्चा केल्याचे दिसलं नाही. त्यामुळे असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. या सर्व घडामोडी बघता महायुती सरकारमध्ये सध्या सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र जरी दाखवण्यात येत असलं तरी अंतर्गत नाराजीच वातावरण जाणवत आहे.
भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असल्याची चर्चा आहे. आमदारांचा आरोप होता की नगरविकास खात्याचा निधी वाटप प्रामुख्याने केवळ शिवसेना संबंधित नेत्यांना दिला जातो. या तक्रारीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आणि यापुढे नगरविकास खात्याचा कोणताही निधी देताना अंतिम स्वाक्षरीसाठी आपल्याकडे येईल असे निर्देश काही दिवसांआधीच दिले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या काही निर्णयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. या संदर्भात चौकशीचे सुद्धा आदेश देण्यात आल्याची माहिती चर्चेत आहे तर शिंदेनी घेतलेल्या काही निर्णयांना फडणवीसांनी ब्रेक दिल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होते. खरं तर या बारीक सारीक गोष्टींवरून फडणवीस किंवा शिंदे यांच्यातील कलगीतुरा दिसून येतो. दुसरीकडे अजून एक अशी चर्चा आहे की एकनाथ शिंदेनी आपल्या दिल्ली दौऱ्या दरम्यान वकिलांसोबत देखील चर्चा केली. आगामी काळात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या वकिलांसोबत चर्चा केल्याचं सांगितलं जातय. शिंदे दिल्लीला असल्यानं या निमित्ताने शिवसेनेचे सर्व खासदार दिल्लीत एकत्र आहेत. त्यामुळे पक्षासंबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत. एकीकडे शिंदे गटातील नेते संजय शिरसाठ, संजय गायकवाड, दादा भुसे, योगेश कदम असे अर्धा डजन नेते अडचणीत असताना तिकडे दिल्लीतही शिंदेनी आपल्या खासदारांची कान उघडणी करून पक्षाचं नाव खराब होणार नाही असं काम करण्याचा दम दिल्याची चर्चा आहे. शिंदे दिल्लीत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या म्हणजे काहीच दिवस आधी दिल्ली दौरा केला होता. यावेळी त्यांनी भाजप पक्षश्रेष्टींच्या सोबत चर्चा केल्याची माहिती आहे. या बैठकीत मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवायचं आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्याला चेकमेट म्हणून शिंदेनी दिल्लीवारी केल्याचं बोललं जातय. दरम्यान आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या भेटींना अधिक महत्त्व आल आहे.
आगामी काळात ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीसाठी मोठं चॅलेंज असणार आहे. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येत असताना दुसरीकडे महायुतीत अंतर्गत खटके उडत असल्याचं दिसतय. याचे एक उदाहरण घ्यायचं झालं तर संजय शिरसाट विरुद्ध भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात अधिकाऱ्यांच्या बैठकीवरून उडालेले खटके, खुद्द गृहमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्या डान्स बारवर पोलिसांनी नागपुरी वरदहस्ताने टाकलेले छापे, दादाजी भुसे यांच्या नतेवाइकांवरील इडीचे छापे ही काही उदाहरणे बघितली तर भाजप विरुद्ध शिंदेगट अशी सरळ सरळ लढाई सुरू झालेली दिसून येते. त्यामुळे एकीकडे ठाकरेंचे आव्हान तर दुसरीकडे महायुतीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर या राजकीय धावपळीला महत्व आलेल दिसते. भाजपा आणि शिंदे गटाचा जांगड गुत्ता सुरू असताना तिकडे अजितदादा आपल्या माणसांना हळूशी मंत्रिमंडळात सामावून घेण्याच्या बेतात आहेत. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत लाईन लावल्याच बोललं जातय माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आठ दिवसात तब्बल तीन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने हा खटाटोप कशासाठी असा प्रश्न विचारला जातेय. या बातम्या येत असताना तिकडे दिल्लीत सुनील तटकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची अगदी धवती भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. परंतु या धावत्या भेटीत देखील अमित शहांचा दिसत असलेला गंभीर चेहरा नक्कीच काहीतरी गंभीर विषयावर सुनील तटकरेंनी शहांची भेट घेतल्याचं स्पष्ट सांगतेय. थोडक्यात काय तर महायुतीत सध्या संगीत खुर्चीचा गेम खेळला जातोय. कोण कोणाची खुर्ची कधी ओडून घेईल आणि समोरचा चाल करेल ते सांगता येत नाही. हा खेळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी, पैशांसाठी असला तरी यातून सर्वसामान्य जनतेचा काय स्वार्थ आहे असा प्रश्न सुद्धा राजकारन्यांना पडलं तर नवलच.