तीन बोगस डॉक्टरांवर महापालिकेची कारवाई
schedule16 Jul 25 person by visibility 25 categoryक्राइम न्यूज

वृत्तसंस्था - कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना, वैद्यकीय व्यावसायिक नसताना दवाखाना चालवून, रूग्णांवर शस्त्रक्रिया करणार्या, अॅलोपॅथीची औषधे देणार्या तिघा बोगस डॉक्टरांवर महापालिकेने कारवाई केली. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप बाबासाहेब बागल (रा. विराज कॉलनी, तारकपूर बस स्थानकासमोर, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंजारगल्ली येथील डॉ. ठाकूर क्लिनिकचे ओम संतोष ठाकुर (रा. पिंजार गल्ली, अहिल्यानगर), चाँदसी दवाखाना डॉ. एम. डी. हालदारचे मृत्युंजय धनंजय हालदार व त्यांचा मुलगा संजय मृत्युंजय हालदार (दोघे रा. पिंजार गल्ली, अहिल्यानगर) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 319 (2), 318(4), इंडियन मेडिकल काऊंसिल अॅक्ट 15 (2), सह महाराष्ट्र प्रॅक्टीश्नर अॅक्ट कलम 33 (2), 33 (ब), 36 नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. आरोग्य सेवा रूग्णालय (राज्यस्तर) मुंबई येथून महापालिकेच्या आरोग्य विभागाला संशयित तिघा बोगस डॉक्टरांबाबत कळवण्यात आले होते. प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी डॉ. बागल, वैद्यकीय सहायक डॉ. कविता माने, मुख्य लिपीक सचिन काळभोर, वरिष्ठ परिचारिका स्नेहलता पारधे-क्षेत्रे यांना तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.