दत्तात्रय कदम (कोल्हापूर) - जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून शेतकऱ्यांशी संवाद साधा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिल्या.
जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या आयोजनासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यांनतर जिल्हाधिकारी यांनी याबाबत नियोजन बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे संजय पाटील, रोहित बांदिवडेकर, स्मिता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, उपजिल्हाधिकारी शक्ति कदम यांच्यासह महापालिका अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जावा. लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावेत. सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही राहणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कालवे दुरुस्ती, कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा मध्ये कालव्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात यावे. या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.
पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा उंचावेल. या कामात स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचाही सहभाग घेऊन जलव्यवस्थापनाच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. तसेच कालव्यांवरील अतिक्रमणे काढण्यासही प्राधान्य देण्यात यावे.
जलसंपदा विभागाच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. या जागांची ७/१२ वर नोंदणी करून घ्यावी. यासाठी ॲक्शन प्लॅन करण्यात यावा. जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या जागेवरील अतिक्रम काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणी वापर ठरला असून त्यानुसार पाणी वापराचे ऑडिट करून घ्यावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका आणि आणि क्षेत्रीस्तरावर उपाययोजना राबविण्यात याव्यात.
‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ मध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शेतकरी, पाणी वापर संस्था संवाद, थकीत पाणीपट्टी वसुली, जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.