सुशांत पोवार (संपादकीय) - राजकारण हे एकाच समीकरणावर चालत नाही तर इथे नात्यांच्या पलीकडे जाऊन सत्तेचा खेळ सुरु असतो, आणि त्यात एक पाउल पुढे टाकण्यासाठी आपल्यातल्याच माणसाला ही मागे टाकावं लागत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशाच एका संभाव्य मास्टर प्लॅनची चर्चा रंगली आहे, आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, त्यांचे पुतणे अजितदादा पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे. सध्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे, शरद पवार अजित पवारांवर कुर्घुडी करत सुप्रिया सुळे यांना पुढे आणण्याची मोठी खेळी खेळत आहेत. या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात धुमाकूळ घालत आहेत. अजितदादांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभा केलेला बंडाचा डाव, भाजपसोबत सत्ता वाटाघाटी करत नव्या गटाची उभारणी आणि त्यातून आलेली सत्तास्थिती हे सगळ पाहता शरद पवार यांचा पक्ष आता दोन टोकांवर उभा आहे. पण एवढ्या संघर्षानंतरही शरद पवार शांत आहेत असे जर वाटत असेल तर ते फक्त वरून दिसणारं राजकारण आहे. त्यांच्या खेळी सध्या इतक्या खोलवर जात आहेत कि ज्याचा शेवट अजित पवारांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो. हाच नेमका विषय काय सविस्तर आजच्या संपादकीय मधून वाचकांसाठी देत आहोत.....
खरंतर जेव्हा पासून अजितदादा पवारांनी शरद पवारांची साथ सोडून स्वतंत्र गट चालवायला सुरुवात केली त्यानंतर सुप्रिया सुळे यांना शरद पवार यांनी वेळोवेळी पुढ केलं आणि या प्रत्येक क्षणात स्पष्ट राजकीय संकेत दिला कि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पुढचा चेहरा, पुढची विश्वासार्ह ओळख आणि पक्षाच्या विचारसरणीचा वारसा सुप्रिया सुळे यांच्याकडेच सोपविला जाणार आहे. यामागील काही महत्वाच्या घटनांवर नजर टाकली तर लक्षात येते कि शरद पवार यांनी केवळ त्यांच्या कन्येला पक्षातील भूमिका दिल्या नाही तर संपूर्ण पक्ष यंत्रणेचा केंद्रबिंदूचं बनवत नेलं आहे. विशेष करून २०२३ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्किंग प्रेसिडेंट पदी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती हि एक केवळ पद देण्यापुरती बाब नव्हती तर ती शरद पवार यांनी केलेली एक राजकीय घोषणा होती कि पुढचा निर्णय सत्तेचा अधिकार आता सुप्रिया सुळे यांच्याकडेच असणार आहे. याशिवाय पक्षाच्या अंतर्गत धोरणात्मक बैठका, महाराष्ट्रातील दौरे, निवडणुकांच्या संदर्भातील महत्वाचे निर्णय, प्रसारमाध्यमांपुढे पक्षाचे प्रतिनिधित्व, या सगळ्यातं सुप्रिया सुळे यांचा सहभाग लक्षणीय वाढलेला आहे. अगदी नागपूर सारख्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले कि स्थानिक युतीचं धोरण आपण ठरवावं हे स्वतंत्र कार्यकर्त्यांना आहे म्हणजेच केवळ दिल्ली मुंबईच्या बैठकीतचं नव्हे तर स्थानिक राजकारणात ही सुप्रिया सुळे यांचा शब्द अंतिम ठरत चालला आहे. त्याचवेळी अलीकडे धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदावरून त्यांनी उघड विरोध नोंदविणे, मुख्यमंत्री योजनेतील गैरप्रकारवर सीबीआय चौकशीची मागणी करणे किंवा ऑपरेशन सिंदूर सारख्या प्रकरणात सरकारला कोंडीत पकडणे हे सगळ फक्त विरोधी पक्षातील एक खासदार म्हणून नाही तर पक्षाचा प्रमुख राजकीय आवाज म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका आहे.
या सगळ्या हालचाली पाहता स्पष्टपणे दिसून येते कि शरद पवार हे केवळ राजकीय वारसा हस्तांतरण करत नाहीयेत तर पक्षाची नवी रचना करत आहेत. ज्यात सुप्रिया सुळे यांचा राजकीय ठसा अधिक ठामपणे उमटविला जातोय आणि दुसरीकडे अजित पवारांच्या हालचाली त्यांच्या वेगळ्या गटाच्या स्थापनेनंतर त्यांचे शरद पवारांसोबतचे अंतर वाढलेले दिसत आहे. या पार्श्वभूमीवर असे म्हणणे चुकीचं ठरणार नाही कि शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना वेळोवेळी पुढे केलं नाही तर पार्टीचा भविष्यातील चेहरा म्हणून ठामपणे पुढे रेटले आहे. या मागे त्यांच्या अनुभवाचे राजकारण आहे, नेतृत्व गुणांवरचा विश्वास आहे आणि सर्वात महत्वाचे पक्षाच्या विचारधारेवर आणि वारसावर त्यांचा दावा सुरक्षित ठेवण्याचा त्यांचा दूरदृष्टीचा प्लॅन आहे असे देखील बोलले जातेय. आणि आता देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वळणावर एक निर्णायक मोड आलेला आहे आणि या वळणावर सर्वाधिक ठसा उमठवत आहेत त्या म्हणजे खासदार सुप्रिया सुळे, वडील शरद पवार यांच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या पक्षात आता त्यांच्या कन्येची छाया किंवा वाढत नाहीये तर निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी पोहचली आहे. पुणे महानगरपलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका हे स्पष्ट करत आहे कि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन गटामध्ये केवळ मतभेद नाहीत तर थेट स्पर्धा सुरु झाली आहे. आणि सुप्रिया सुळे या स्पर्धेचं नेतृत्व अत्यंत ठामपणे करताना दिसत आहेत. या बैठकीत केवळ निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला नाही तर सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला स्पष्ट संदेश दिला या निवडणुकीत आपले नगरसेवक अजित पवारांच्या गटाच्या तुलनेत अधिक संख्येने निवडून यायला हवेत हि केवळ रणनीती नाहीये तर पक्षातील अंतर्गत संघर्षाची देखील जाहीर कबुली होती. याच बैठकीत त्यांनी येणाऱ्या निवडणुकांची ही दिशा ठरवली आहे. एवढंच नव्हे तर “एक देश एक निवडणूक” या चर्चेवर भाष्य करत देश पातळीवर सुद्धा आपली सज्जता दाखवली. हि केवळ एक पुण्यातील बैठक नव्हती तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नव्या युगाची सुरुवात होती. जिथ अजित पवारांना मागे टाकण्यासाठी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जाणीवपूर्वक, नियोजनपूर्ण जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. त्यामुळे हि एक मास्टर प्लॅनची सुरुवात आहे कि राजकीय वारसाच्या संघर्षाची नांदी हे येणारा काळचं ठरवेल. सध्या तरी सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या पक्षाच्या राजकीय केंद्रबिंदूच्या रुपात पुढे सरसावत आहेत हे मात्र नक्की....